महापुरुषांनी समाज घडवला, पुतळा सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही!

आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे प्रतिपादन; माजी आमदार दिलीपकुमार सानंदा म्हणाले, आपण हिंदू आहोत...! अंचरवाडीत पार पडला हिंदुसुर्य महाराणा प्रताप पुतळ्याचा सौंदर्यीकरण सोहळा..
 
Hdhd
अंचरवाडी(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशाच्या जडघडणीत महापुरुषांचे खूप मोठे योगदान आहे. हिंदुसुर्य महाराणा प्रताप यांनी तळागाळातील समाजाला सोबत घेऊन स्वाभिमानाचा लढा दिला. त्यांचा इतिहास तरुणांनी ध्यानात घेण्याची गरज आहे. मतदारसंघातील कोणत्याही गावात ज्या महापुरुषांनी समाज घडवला त्यांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचा शब्द आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिला. अंचरवाडी येथे हिंदुसूर्य महाराणा प्रताप स्मारकाचा सौंदर्यीकरण सोहळा ९ मेच्या सायंकाळी पार पडला, यावेळी ते बोलत होते. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार रेखाताई खेडेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ.शिंगणे म्हणाले की, सध्याच्या सरकारने सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील ११८ कोटींच्या कामांना स्थगिती दिली, त्याबद्दल न्यायालयात केस सुरू आहे. मात्र आमदार निधी हक्काचा निधी आहे, तो कुणी रोखू शकत नाही. त्यातील काही टक्के निधी हा महापुरुषांच्या स्मारक सुशोभीकरणासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय आपण घेतला आहे. कारण महापुरुषांचे स्मारक पाहून समाजाला प्रेरणा मिळते असेही डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले. हिंदूसूर्य महाराणा प्रतापांच्या पराक्रमाची नोंद इतिहासाने घेतली. चंद्र सूर्य असेपर्यंत महाराणा प्रतापसिंह यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी ठरेल असेही डॉ.शिंगणे यावेळी म्हणाले. स्मारक सुशोभीकरणासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या युवकांसह गजानन प्रल्हाद परिहार यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
   माजी आमदार दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांनी स्वाभिमान जपला. त्यांचा त्याग, शौर्य आपल्याला प्रेरणा देतोय. जो समाज संघटित असतो, अहकांर द्वेषाला जो समाज तिलांजली देतो त्या समाजाची प्रगती कुणी थांबवू शकत नाही असे सांगत समाजाच्या संघटनेची गरज असल्याचे ते म्हणाले. जो समाज संघटित होऊन शासन प्रशासनाला चमत्कार दाखवतो त्याच्याच पुढे शासन नतमस्तक होते माजी आमदार सानंदा म्हणाले. १४ मे रोजी छत्रपती संभाजीनगरात होणाऱ्या सकल राजपूत समाजाच्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार सानंदा यांनी केले. आपण हिंदू आहोत, स्वाभिमानी आहोत त्यामुळे महाराणा प्रताप यांची जयंती तिथीनुसार साजरी व्हावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान परिहार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन प्रल्हाद परिहार, महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रामेश्वर परिहार, उपाध्यक्ष एकनाथ परिहार, सचिव योगेश परिहार, विजय परिहार, परमेश्वर परिहार, किशोर परिहार, गणेश परिहार ,अविनाश परिहार, श्रीकृष्ण परिहार, शिवदास परिहार,संदीप परिहार, सोपान परिहार, वैभव परिहार यांच्यासह महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.