अनुदानावरील हरभरा, ज्वारी बियाणे उचला!

परमिटप्राप्त शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन
 
 
File Photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शासनाच्या बियाणे वितरणाकरिता महाडीबीटी पोर्टलवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत तसेच ग्राम बिजोत्पादन अंतर्गत हरभरा व गहू १० वर्षांआतील प्रमाणित बियाणे वितरण व ज्वारी १० वर्षांआतील व १० वर्षांवरील प्रमाणित बियाणे वितरणासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानावरील बियाणे उचल करण्यासाठी तालुका कृषि अधिकाऱ्यांनी ऑनलाइन निवड झालेल्या शेतकऱ्यांना परमिट दिलेले आहेत.

परमिटव्दारे शेतकऱ्यांनी १० नोव्हेंबरपर्यंत अनुदानावरील हरभरा व ज्वारी उचल करावी. १० नोव्हेंबरनंतर हे परमिट बाद होणार आहे. त्यानंतर परमिट धारक ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानित प्रमाणित बियाणे वितरणाचे बियाणे मिळाले नाही तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शेतकऱ्यांची राहील. त्याबाबत कुठलीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नाही. ११ नोव्हेंबरपासून हरभरा १० वर्षांआतील प्रमाणित बियाणे वितरण व ज्वारी १० वर्षांआतील व १० वर्षांवरील अनुदानावरील सर्व प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाइन शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांसाठी खुले होणार आहे. शेतकऱ्यांच्या सातबारावरील क्षेत्रानुसार ०.४० आरपासून ते जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत क्षेत्रासाठी प्रमाणित बियाणे वितरणाअंतर्गत अनुदानावर मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी, महाबीज वितरक, एन.एस.सी वितरक, कृभको वितरक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांनी केले आहे.

अनुदानीत दर प्रति किलो
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य-  हरभरा पिकासाठी १० वर्षांआतील वाण ६१ रुपये प्रति किलो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान तृणधान्य - ज्वारी पिकासाठी १० वर्षांआतील वाण ३० रुपये प्रति किलो व १० वर्षांवरील वाण ३८ रुपये प्रति किलो, मालदांडी, फुले, वसुधा १० वर्षांवरील वाण ३१ रुपये किलो, ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम - हरभरा बियाणे १० वर्षांवरील वाण ५५ रुपये प्रति किलो व गहू १० वर्षांआतील वाण २३ रुपये प्रति किलो व १० वर्षांवरील वाण २१ रुपये प्रति किलो.