हरभरा धोक्यात; पुढील चार दिवस पुन्हा पावसाचे!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात गारपीट झाली. अवकाळी पाऊस झाला आणि धुकेही पसरले. त्यामुळे रब्बी हंगामातील फुलांच्या बहरात असलेली पिके संकटात सापडली. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे सकाळी उशिरापर्यंत धुक्याची चादर पसरत आहे. आता पुन्हा आज, ११ जानेवारी रोजी हवामान खात्याने पुढील ४ दिवस तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असलेले १ लाख ८४ हजार ९५५ हेक्टर क्षेत्रातील हरभरा पिक धोक्यात सापडले आहे.

खरिपातील सोयाबीननंतर रब्बी हंगामातील हरभरा हे शेतकऱ्यांचे महत्त्वाचे नगदी पीक आहे. यंदा १ लाख ८४ हजार ९५५ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी झाली आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांचे पिक फुलांच्या बहरात आहे. मात्र सकाळी पसरत असलेल्या धुक्यामुळे फुलगळ होत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस झाला तर परिपक्व झालेल्या पिकाचेसुद्धा नुकसान होऊ शकते.

जिल्ह्यात ११ ते १४ जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. मात्र सर्वदूर ढगाळ वातावरण असल्याने धुके पडण्याची शक्यता आहे. १५ जानेवारीनंतर हवामान कोरडे राहील, अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने आज वर्तविली आहे. अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी मळणी व कापणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र व बुलडाणा कृषी विज्ञान केंद्राने केले आहे.