सरकारतर्फे योजनांचा पाऊस, संकटाचे आभाळ महसूल कर्मचाऱ्यांवर ! महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने ; म्हणाले दखल घ्या, अन्यथा १५ जुलैनंतर..
Jul 11, 2024, 15:14 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) राज्याच्या अर्थसंकल्पात विविध योजनांचा पाऊस बरसला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली. या योजनेच्या लाभासाठी राज्यातील हजारो महिला अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत गुंतल्या आहेत. असे असताना महसूल कर्मचाऱ्यांवर अश्या विविध योजनांचा भार वाढला असल्याचे सांगत मुख्य कामकाजावर प्रभाव पडत आहे. तसेच महसूल कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यासंदर्भात आज ११ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचारी संघटनेतर्फे निदर्शने करत सरकार विरोधात रोष व्यक्त केल्या गेला.
बुलढाणा येथील महसूल विभागात कार्यरत असलेले बहुसंख्य कर्मचारी व महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संपूर्ण राज्यभरात महसूल कर्मचारी संघटनेतर्फे प्रलंबित मागण्या संदर्भात आंदोलन होत आहे. काल काळ्या फिती बांधून महसूल कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज केले. आज निदर्शने करण्यात आली तर उद्या लेखनी बंद करण्यात येणार असल्याचे संघटनेने सांगितले आहे. निदर्शने केल्यानंतर माध्यमांशी बोलताना महसूल कर्मचारी म्हणाले की, विभागाचा २००६ पासून आकृतीबंध २०१६ मध्ये होणे अपेक्षित होते. परंतु आजवर ते झालेले नाही. जवळपास अठरा वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप पदवाढ करण्यात आलेली नाही. शिवाय, राज्याच्या अर्थसंकल्पात नुकत्याच विविध घोषणा जाहीर झाल्या असून त्याचे कामकाज पूर्णतः महसूल विभागावर सोपविण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची कामेही महसूल विभागाला देण्यात आली. यामुळे इतर कामे करताना याचा प्रभाव जाणवत आहे.
सामान्य जनतेचा प्रचंड रोष महसूल कर्मचाऱ्यांवर निर्माण झालेला आहे. एवढेच नाही तर, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे या प्रकारच्या घटनाही समोर आल्यात. सरकारच्या विविध योजनांचा ताण महसूलवर पडला आहे. हे, सरकारने लक्षात घेतले पाहिजे. तसेच प्रलंबित मागण्यांमध्ये सुधारित आकृतीबंध तात्काळ मंजूर व्हावा, अव्वल कारकूनचे बदनाम बदलून सहाय्यक महसूल अधिकारी असे करण्यात यावे अश्या विविध प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी. दखल न घेतल्यास १५ जुलै नंतर राज्यभरातील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.