"शासन आपल्या दारी" पण महायुतीच्या घटकपक्षांत "नाराजी"! रिपाइं चे जिल्हाध्यक्ष नरहरी गवईंना संताप;म्हणाले, त्यांनी आम्हाला कमजोर समजू नये,परिणाम भोगावे लागतील..

 
Bxbxb
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शासन आपल्या दारी कार्यक्रम काल,३ सप्टेंबरला बुलडाण्यात संपन्न झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजप शिवसेनेचे लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. सत्ताधारी गटात असूनही आ. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवीत सकल मराठा समाजाच्या वतीने देऊळगावराजात आयोजित मोर्चाला उपस्थित राहण्यात प्राथमिकता दिली. कार्यक्रमाची जाहिरात करतांना फोटोंचा प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही, माजी मंत्री आणि जिल्ह्यातील सर्वात वरिष्ठ आमदार असताना डॉ.शिंगणे यांचा फोटो मात्र शेवटच्या क्रमांकावर होता. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावरून नाराज होतेच..आता पुन्हा सत्ताधारी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपाइं आठवले गटाची नाराजी समोर आली आहे. या कार्यक्रमातून रिपाइं ला डावलण्याच काम स्थानिक आयोजकांनी जाणीवपूर्वक केलं. त्यांनी आम्हाला कमजोर समजू नये, आमच्यासोबत दुजाभाव करणं महायुतीला जड गेल्याशिवाय राहणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया रिपाइं चे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनी दिली आहे.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपाइंच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले नव्हते. कार्यक्रमाच्या जाहिरातीत बॅनर वर रिपाइं नेते रामदास आठवले यांचा फोटो नव्हता यामुळे रिपाइं कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे असे नरहरी गवई म्हणाले.रिपाइं ची ताकद जिल्ह्यात भक्कम आहे, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला कमजोर समजले तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. आमच्यासोबत दूजाभाव करणे महायुतीला जड गेल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत या प्रकाराची वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे नरहरी गवई म्हणाले. लवकरच रिपाइं ची जिल्हा बैठक घेण्यात येणार असून त्या बैठकीत स्थानिक पातळीवर काय करायचे याचा निर्णय घेऊ असेही नरहरी गवई म्हणाले.