BREAKING जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात;रविकांत तुपकरांच्या आंदोलन व पाठपुराव्याला यश!

तुपकरांनी सरकारला ठणकावले; म्हणाले,कमी शेतकऱ्यांना पिकविमा देवून बोळवण करण्याचा प्रयत्न करू नका...

 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रविकांत तुपकर यांनी केलेले आंदोलने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. गतवर्षीच्या खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते. रब्बी हंगामात झालेल्या पिक नुकसानीचा पिकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. परंतु कमी शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा जमा करून कंपनीने शेतकऱ्यांची बोळवण करू नये, संपूर्ण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पिकविम्याची रक्कम जमा करावी, अशी आग्रही मागणी रविकांत तुपकरांनी केली आहे.
  बुलढाणा जिल्ह्यात गेल्या खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या झालेल्या नुकसानीचा पिकविमा शेतकऱ्यांना मिळावा म्हणून रविकांत तुपकरांनी सातत्याने आंदोलने केली होती. चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे केलेले अन्नत्याग आंदोलन व त्यानंतर मुंबई येथील मंत्रालय ताबा आंदोलन व त्यावेळी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पिकविमा देण्याची मागणी मान्य झाली होती. परंतु रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांसह रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा नागपूर अधिवेशनावर धडक दिली होती.
त्यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पिकविमा देण्याचे त्यांनी मान्य केले होते. त्यानंतर पिकविम्याची काही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पण हजारो शेतकरी पिकविम्यापासून वंचित होते. त्यामुळे रविकांत तुपकरांनी दि.१२ जून २०२४ रोजी पुन्हा एकदा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेवून पिकविम्याची मागणी लावून धरली व प्रधान सचिव (कृषि) यांच्याकडेही पाठपुरावा केला. त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रविकांत तुपकरांच्या आंदोलन व पाठपुराव्याला यश आले असून यामुळे काही ना काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.