शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आजच बँक खाते तपासा; जिल्ह्यातल्या ३ लाख २९ हजार शेतकऱ्यांना मिळाला राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता; केंद्राचे अन् राज्याचे मिळून वर्षाला १२ हजार मिळणार...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातल्या ३ लाख २९ हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यानेही नमो किसान महासन्मान योजनेची सुरुवात केली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यास सुरूवात झाली आहे. काल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्य सरकारने या योजनेचा शुभारंभ केला आणि पहिला हप्ता शेतकऱ्यांना वितरीत केला.
 

 केंद्र सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये देण्यात येतात. ४ महिन्यातून एकदा २ हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. आतापर्यंत या योजनेचे १४ हप्ते सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान गेल्या वर्षी शिंदे फडणवीस सरकारने याच धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजनेची  सुरुवात केली. या योजनेत देखील शेतकऱ्यांना ४ महिन्यातून एकदा २ हजार असे वर्षाला ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेचा पहिला हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.

   जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा हफ्ता मिळतो ते सगळेच शेतकरी राज्याच्या योजनेसाठी पात्र आहेत. जिल्ह्यातल्या ३ लाख ४० हजार १२४ शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केलेली आहे. मात्र त्यातील ९६ टक्के शेतकऱ्यांनीच ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे काल व आज जिल्ह्यातल्या ३ लाख २९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात राज्याच्या योजनेचे २ हजार रुपये जमा झाले आहेत.