कामाची बातमी! सप्टेंबर महिनाही कोरडाच जाणार का? हवामान तज्ञांनी काय सांगितल वाचा...

 
Hdhd
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात घाटाखाली २२ जुलैला झालेली अतिवृष्टी वगळता दमदार पाऊस झालेला नाही. घाटावर तर अक्षरशः कोरड पडलेली आहे. बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात अवघे काही दिवस पुरेल एवढे पाणी शिल्लक आहे. अधूनमधून झालेली रिमझिम वगळता घाटावर "वाहुनी" पाणी झालेला नाही. 
जून, जुलै मध्ये पावसाने शेतकऱ्यांचे समाधान केलेले नाही. आता महिना देखील संपत आला आहे. ऑगस्ट महिन्यातील मधले ४ दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते, रिमझिम का होईना पाऊस पडल्याने सोयाबीन ने तग धरली मात्र त्यानंतर हवा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याकडून शेतकऱ्यांना आशा आहेत.
 मात्र शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी घेऊन सप्टेंबर महिना येणार असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन महिन्यांत जसे चित्र होते तसेच चित्र सप्टेंबर महिन्यात राहील अशी शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. हवामान तज्ञांच्या मते अल निनो सध्या सुप्त अवस्थेत आहेत, मान्सून ला पूरक असे वातावरण तयार होत नसल्याने मुसळधार पाऊस बरसत नाही. केवळ बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे बहुतांश महाराष्ट्रात हीच स्थिती आहे. ७ सप्टेंबर नंतर अधून मधून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मात्र आता मध्यम स्वरूपाच्या पावसाने भागणार नाही. सप्टेंबर महिना जर कोरडा गेला तर भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. रब्बी पिकांसाठी पुरेसा जलसाठा अजून धरणांत जमा झाला नाही, जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पात मध्ये अजून पाण्याची आवक नाही त्यामुळे पुढील काळात मुसळधार पाऊस पडला नाही तर मात्र तीव्र पाणीटंचाई चा सामना करावा लागणार आहे.