कामाची बातमी! वन बुलढाणा मिशन एक हजार रोजगार देणार; संदीप शेळकेंनी केली घोषणा! राजर्षी शाहू पतसंस्थेच्या सहकार्याने बँक मित्र संकल्पना राबविणार ​​​​​​​

 
sandip shelke

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):वन बुलडाणा मिशन आगामी तीन महिन्यांत जिल्हयात एक हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार आहे. राजर्षी शाहू पतसंस्थेच्या सहकार्याने बँक मित्र संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामाध्यमातून युवकांच्या हाताला काम देण्याचा उद्देश असल्याची माहिती राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी दिली.

वन बुलडाणा मिशन ही लोकचळवळ आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण  विकासासाठी ही चळवळ काम करीत आहे. मागासलेला जिल्हा ही ओळख पुसून विकसित जिल्हा अशी नवी ओळख मिळवून देण्याचे वन बुलडाणा मिशनचे ध्येय आहे. याद्वारे जिल्हाभर कामे सुरु आहेत.
जिल्ह्यात बेरोजगारी ही प्रमुख समस्या आहे. ही समस्या निकाली निघाल्याशिवाय जिल्ह्याचा विकास अशक्य आहे.या बाबीचा विचार करून राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

राजर्षी शाहू पतसंस्थेचे जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर मोठे जाळे आहे. या पतसंस्थेच्या सहकार्याने शाखास्तरावर बँक मित्र ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. आपल्या गावात, शहरातच रोजगार मिळाल्यामुळे काम करणे युवक- युवतींना सोयीचे होईल. बँक मित्र यांना मानधन देण्यात येणार आहे. सोबतच केलेल्या कामावर इंसेंटिव्ह सुद्धा मिळणार आहे. इच्छुकांनी वन बुलडाणा मिशन किंवा राजर्षी शाहू पतसंस्थेच्या संबधित शाखेच्या कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 बँक मित्र शासन आणि समाजाचा दुवा 

बँक मित्र हा राजर्षी शाहू पतसंस्थेच्या शाखेवर कार्यरत राहील. बँकेच्या दैनंदिन व्यवहारांशी संबधित कामे त्यांच्याकडे असणार आहेत. नवीन खाते उघडणे, पिग्मी खाते, डिपॉझिट, गोल्ड लोन, वसुली, पतसंस्थेच्या कामाची माहिती देणे.  शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या विविध शासकीय योजना, अनुदानाच्या योजनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे.  पीकविमा, महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या योजनांची माहिती संकलित करुन अर्ज शासकीय यंत्रणेकडे पोहचवण्याचे काम त्यांच्याकडे असणार आहे.  कृषी, आरोग्य, शिक्षण, सहकार क्षेत्रात काम करुन वन बुलढाणा मिशनचा प्रतिनिधी आणि शासन व समाजाचा दुवा म्हणून बँक मित्र काम करणार असल्याचे संदीप शेळके यांनी स्पष्ट केले.

देशातील उद्योजकांना जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न 

सध्या राजर्षी शाहू पतसंस्थेच्या सहकार्याने वन बुलडाणा मिशन बँक मित्र संकल्पना राबवित आहे. येत्या काळात जिल्हयातील अनेक बँक, पतसंस्था, कंपन्यांच्या माध्यमातून सुद्धा विविध उपक्रम राबविण्यासाठी वन बुलडाणा मिशन पुढाकार घेणार आहे. देशातील नामांकित उद्योजकांनी जिल्हयात उद्योग उभारावा यासाठी वन बुलढाणा मिशनद्वारे  प्रयत्न केले जाणार आहेत. यानुषंगाने नामांकित कंपन्यांच्या व्यवस्थापनासोबत बोलणी सुरु आहे. जिल्ह्याची औद्योगिक विकासात भरभराट व्हावी यावर भर देण्यात येणार असल्याचे संदीप शेळके यांनी सांगितले.