GOOD NEWS! लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी १० कोटींचा निधी!

 
lonar

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):जगप्रसिद्ध लोणार सरोवर विकास आराखडयासाठी राज्याच्या नियोजन विभागाने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी पावले उचलण्यात आली होती. त्याच काळात लोणार सरोवराला 'रामसर' स्थळाचा दर्जा मिळाला होता.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाबळेश्वर, एकवीरा देवस्थान, लोणार सरोवर, अष्टविनायक आणि कोकणातील समुद्रकिनारे अशा पर्यटन स्थळांच्या विकासासाठी पुढाकार घेण्यात आला होता. लोणार हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असून या सरोवराच्या संवर्धनासाठी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यास मान्यता दिल्यानंतर राज्य सरकारने आता १० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीतून लोणार सरोवराच्या परिसरात ५३ लहान-मोठी बांधकामे करण्यात येणार आहेत. लोणार सरोवर ४२७ हेक्टरवर पसरलेले आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये लोणारला 'रामसर' स्थळाचा दर्जा मिळाला होता. तेव्हापासून सरोवराच्या संवर्धनासाठी आवश्यक ती पाऊले उचलण्यात आली आहे. मंजूर झालेल्या दहा कोटींच्या निधीमधून कामे केली जाणार आहेत.