"देव तारी त्याला कोण मारी" बिबट्याने हल्ला चढविला! पण सुदैव... केळवदचे शिवाजीराव सुखरूप!

 
चिखली
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील केळवद येथील शेतकरी शेतामध्ये काम करीत असतांना त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढविल्याने ६१ वर्षीय शेतकरी जखमी झाल्याची घटना काल गुरुवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अंत्री शिवारात घडली.
केळवद येथील शेतकरी शिवाजी पंढरीनाथ कालेकर यांचे अंत्री शिवारात शेत आहे. काल १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गव्हाला पाणी देत असतांना त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढविला. बिबट्याने कालेकर यांच्या हनुवटी व छातीवर हल्ला चढविला, यावेळी त्यांनी मोठ्याने आरडाओरड केली, बिबट्याने तेथून पळ काढला अश्या प्रकारे सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. बिबट्याने विचार केला असता तर.. आरडाओरड केली तरी सुद्धा त्यांना मोठी हानी झाली असती. मात्र बिबट्याचा विचार बदलला आणि त्याने तेथून पळ काढला. 
कालेकर बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर तात्काळ गणेश कालेकर, गणेश पांढरे, गोपाल कालेकर,सनी पांढरे, उदय पाटील यांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले. बुलडाणा येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 
 घटनेची माहिती मिळताच बुलढाणा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे व कर्मचारी यांनी घटनास्थळावर धाव घेत पाहणी करुन पंचनामा केला. हिंस्त्र वन्यप्राण्याच्या मुक्तसंचारामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहे. केळवद, अंत्री व आजूबाजुच्या परिसरात अस्वल, बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. हरीण, रोही, कोल्हे हे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करुन त्यांना जेरबंद करण्याची मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे.