जलसंधारण विभागाचा 'महाप्रताप' सिमेंट बंधाऱ्यासाठी जांभळीचे पाच झाडे तोडली! शेतकरी महिलेला पूर्वकल्पना न देताच बांधला सिमेंट बंधारा! महिला शेतकरी यांची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी तक्रार..

 
चिखली (ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जलसंधारण विभागाने कुठलीही पूर्वकल्पना न देता महिलेच्या शेतात सिमेंट बंधारा बांधून ५ झाडे तोडली. देऊळगाव राजा तालुक्यातील खडका शिवारात जलसंधारण विभागाने हा महाप्रताप केला. यामुळे, या शेतीच्या मालक शेतकरी महिलेचे मोठे नुकसान झाले असून न्याय मिळावा यासाठी त्यांनी ११ जून रोजी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना याबाबत लेखी तक्रार दिलीं 
 चिखली तालुक्यातील मनुबाई गावातील महिला शेतकरी विमल विनायक वायाळ यांची खडका शिवारात गट नंबर २ मध्ये २ हेक्टर ४६ आर अशी मालकीची शेती आहे. त्यांच्या मूळ मालकीच्या जमिनीमध्ये जलसंधारण विभाग देऊळगाव राजा यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांच्या शेतामध्ये सिमेंट बंधारा बांधला. त्या सिमेंट बंधाऱ्यामध्ये अडचणीत येत असलेले पाच जांभळीचे झाडे तोडून त्या ठिकाणी सिमेंट बंधारा बांधल्याची तक्रार जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांना दिली आहे. दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, मागील काही दिवसांमध्ये लग्नसराई व त्यांच्या घरातील पुतण्याचे लग्न असल्यामुळे दोन महिन्यापासून त्या शेतात गेल्याच नाही,आता खरिपाची पेरणी असल्याकारणाने शेतात गेल्या असता त्यांना बांधलेला सिमेंट बंधारा व वडिलोपार्जित असलेले पाच जांभळीचे झाडे तोडलेले आढळून आले. व त्या झाडाचे अनेक खोडं त्या ठिकाणाहून विल्हेवाट लावल्याचे त्यांना दिसून आले,महिला शेतकरी वायाळ यांनी घटनेची चौकशी केली असता त्यांना समजले की, उपविभागीय जलसंधारण विभाग देऊळगाव राजा यांनी ही झाडे तोडून बंधारा बांधला. त्यांनतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला विचारणा केली. त्यावेळी त्यांनी सुद्धा झाडे तोडल्याचे कबूल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यानंतर महिला शेतकरी वायाळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांना तक्रार देऊन सांगितले की, पूर्वसूचना न देता बांधलेला सिमेंट बंधारा व वडिलोपार्जित जांभळीचे झाडे आणि त्या झाडापासून पासून त्यांना मिळणारे लाखोचे उत्पन्न याचे नुकसान झाल्याने त्वरित न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.