भरदिवसा पेटल्या शेकोट्या!; बुलडाण्यात पारा घसरला

 
शेकोटी
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एकीकडे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असतानाच दुसरीकडे थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या बुलडाणा शहरात मागील दोन दिवसांपासून पारा चांगलाच घसरला आहे. आज, १५ जानेवारीला कमाल तापमान २३ अंश सेल्सीअस तर किमान तापमान १४ अंशावर येऊन ठेपले होते. गारठा वाढल्याने शहरात भरदिवसाच शेकोट्या पेटवाव्या लागल्या. दुपारच्या जेवणाच्या सुटीत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा शेकोटी पेटवताना दिसले.

पश्चिम विदर्भातील हिलस्टेशन म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा शहराचे मागील दोन ते तीन दिवसांपासून तापमान कमी झाले आहे. काही दिवसांपासून सूर्य दर्शनच होत नसल्याचे चित्र आहे. अशातच ढगाळ वातावरण आणि कडाक्याची थंडी असा विपरीत योग जुळून आल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. कोरोना टेस्ट वाढल्या असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय सर्दी, तापेच्या रुग्णांमुळे दवाखान्यातील गर्दी वाढली आहे.

पुढील दिवसांत असे राहील तापमान...

  • आज, १५ जानेवारी ः कमाल २३, किमान १४,
  • उद्या, १६ जानेवारी ः कमाल २६, किमान १४,
  • परवा, १७ जानेवारी ः कमाल २६, किमान १४