लोणार मध्ये अग्नितांडव! गिफ्ट सेंटरला आग,२५ लाखांचे नुकसान! आज सकाळची घटना

 
लोणार(प्रेम सिंगी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार शहरात आज सकाळी एका गिफ्ट सेंटरला भीषण आग लागली. या आगीत जवळपास २० ते २५ लाखांचे नुकसान झाले. वेळेवर अग्निशामक दलाचे वाहन पोहचल्याने गिफ्ट सेंटरच्या बाजूला असलेले फर्निचर गोडावून आणि भुसार मालाचे गोडावून संभाव्य धोक्यातून थोडक्यात वाचले. सकाळी १० वाजता लोणार शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात ही घटना घडली.
  प्राप्त माहितीनुसार संगीता शिवाजीराव राजगुरु (शेळके) यांचे राजमाता जिजाऊ नावाने लहान मुलांचे खेळणे व गिफ्टचे दुकान आहे. सकाळी दहाच्या सुमारास दुकान बंद असताना त्यातून धूर निघत असल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अवघ्या काही मिनिटांत अग्निशामक दलाचे वाहन पोहचले मात्र तोपर्यंत दुकानातील बरेचसे समान जळून खाक झाले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. वेळेवर आग नियंत्रणात आली नसती तर आजूबाजूच्या दुकानांना देखील धोका होता. शॉर्टसर्किट मुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे.