नवरदेवासह १०० वऱ्हाडींवर आग्यामोहळाचा हल्ला! मधमाशा चावल्याने वऱ्हाडी सुजले; बँडच्या आवाजाने उठले आग्यामोहळ! नवरदेवाला हॉस्पिटल मध्ये नेले..! घटना दुसरबीडची

दुसरबीड येथील गीतांजली मंगल कार्यालयात एक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये तालुक्यातीलच किनगावराजा येथील फुलसिंग देव्हरे यांचा मुलगा वर मंगेश फुलसिंग देव्हरे ह्याचा शुभ विवाह दुसरबीड येथीलच बबन बिथरे यांची मुलगी वधू गंगा बबन बिथरे हिच्यासोबत होणार होता. त्यादरम्यान किनगावराजा येथून नवरदेवाची वऱ्हाडी मंडळी दुसरबीड येथे पोहोचली.
मंगल कार्यालयात सर्व सोपस्कार व विधी झाल्यावर सायंकाळी परण्याची वरात वाजत गाजत मंगल कार्यालयातून निघाली. त्यानंतर सायंकाळी सुमारे ५.३० वा. सुमारास ही वरात लग्न लावण्यासाठी परत मंगल कार्यालयाकडे जात असतांनाच मार्गावरील बाभूळ बनात बँडच्या वाद्याच्या आवाजाने बाभळीच्या झाडावरील आग्या मोहोळाचे पोळे त्या वऱ्हाडी मंडळीच्या अंगावर पडले. अचानक घडलेल्या ह्या घटनेत मधमाशांनी वऱ्हाडी मंडळी तसेच नवरदेवावर हल्ला चढवला. त्यात वऱ्हाडी मंडळी तर बाधित झालीच तर नवरदेव सुद्धा जखमी झाला. एवढेच नव्हे तर नवरदेव ज्या घोड्यावर स्वार होऊन जात होता.
त्या घोड्याला व त्याची लगाम खेचणाऱ्या मालकाला सुद्धा मधमाशांच्या हल्ल्याचा सामना करावा लागला. त्यावेळी प्रसंगावधान राखत नवरदेव मंगेश ह्याला जवळच्या वाघ हॉस्टेलमध्ये खाजगी दवाखान्यात भरती करावे लागले. याच घटनेत सुमारे १०० वऱ्हाड्यांना मधमाशांच्या चाव्याने ग्रस्त केले. त्यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास नवरदेवाला लग्नस्थळी आणत लग्न लावण्यात आले.