बिबी येथील वसंतराव नाईक विद्यालयात अग्नितांडव! वाचा नेमके काय झाले..
Jul 17, 2024, 15:53 IST
बिबी (जगजित आडे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) लोणार तालुक्यातील बिबी येथे वसंतराव नाईक विद्यालयात काल १६ जुलैच्या रात्री उशिरा अग्नितांडव पाहायला मिळाला. शाळेच्या किचनरूम मधील लाकडी गंजाला अचानक आग लागली. पुढे, आग मोठ्या प्रमाणात भडकली तेव्हा ही आग ग्रामस्थांना दिसली. यांनतर आगीला नियंत्रणात आणण्यासाठी एकच गदारोळ उठला.
सर्वप्रथम, गावातील काही तरुणांना शाळेत आगीचा भडका झाल्याचे दिसून आले. शाळेचे प्राचार्य राठोड सर यांना त्यांनी लगेचच माहिती दिली. त्यांनतर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. थोड्यावेळाने बिबीचे ठाणेदार संदीप पाटील व पोलीस कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. लोणार येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यापूर्वीच गावातील तरुणांनी बकेट आणि हांड्यातून आगीवर पाणी टाकले. आगीचे रूप वाढल्याने मिळेल त्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. घटनास्थळी उपस्थित तरुणांनी, ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी भरगोस मेहनत केली. प्रत्येक जण आगीवर नियंत्रण आणण्यासाठी झटत होता. सुदैवाने दुर्घटनेत कुठलीही जिवीत हानी झाली नाही. परंतु, नुकसान मोठे झाले आहे.