धनिक एडव्हायझर्स कंपनीकडून बचतगटांना ३ कोटींचे अर्थसहाय्य! संदीप शेळके म्हणाले,महिलांनी उद्योगात झेप घ्यावी

 
ss

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महिलांनी चूल आणि मूल ही चौकट कधीचीच ओलांडली आहे. स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुढे आल्या आहेत. जिल्ह्यात महिला बचतगटांचे चांगले जाळे विणले गेले आहे. बचतगटांच्या महिलांनी स्वतःचा उद्योग सुरु करुन आर्थिक झेप घ्यावी, असे प्रतिपादन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले. 

ss

बुलडाणा येथील धनिक एडव्हायझर्स प्रा. लि. कंपनीच्या कार्यालयात महिला बचतगटांना आर्थिक सहाय्य देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना संदीपदादा शेळके म्हणाले, महिलांमध्ये बचत, काटकसर, सहनशीलता, जिद्द, चिकाटी हे नैसर्गिक गुण असतात. कर्ज घेतल्यावर महिला नियमित परतफेड करतात. त्यांचे एकही खाते थकीत नसते. 

महिलांना कर्ज देतांना बँक, पतसंस्था हात आखडता घेत नाहीत. बचतगटाच्या महिलांनी याचा लाभ घ्यावा. घेतलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करावा. स्वतःचा व्यवसाय सुरु करून उन्नती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.  

५० महिलांना ३ कोटींचे वाटप

राजर्षी शाहू परिवार महिला बचतगटांच्या कायम पाठीशी राहिला आहे. महिलांना उद्योग उभारण्यासाठी नियमित आर्थिक पाठबळ देण्यात आले आहे. यामाध्यमातून अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करुन कुटुंबाची उन्नती साधली आहे. दरम्यान २७ सप्टेंबर रोजी संदीपदादा शेळके यांच्या हस्ते  चिखली तालुक्यातील बचतगटांच्या ५० महिलांना ३ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले.