अखेर शासनाने मयत दाखवलेल्या शेतकऱ्यांना पात्र करण्यात येणार! कृषी उपायुक्तांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; विनायक सरनाईक आणि राम डहाकेंच्या आंदोलनाला यश! राम डहाके काय म्हणाले पहा व्हिडीओत..

 
चिखली( गणेश धुंदाळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पंतप्रधान किसान सन्मान योजनेत पात्र शेतकऱ्यांना मयत दाखवून त्यांना अपात्र केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राम डहाके यांनी यासंदर्भात आवाज उठवत आंदोलने केली होती. अखेर त्या आंदोलनांची दखल शासनाने घेतली आहे. कृषी उपायुक्तांनी जिल्हा प्रशासनाला आदेश देत चुकीने मयत दाखवलेल्या शेतकऱ्यांना पात्र करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मयत दाखवलेल्या शेतकऱ्यांना पात्र करण्याची पद्धत केंद्र शासनाने निश्चित केली आहे. त्यानुसार पी एम किसान गो आय ॲप चा वापर करून अशा शेतकऱ्यांना पात्र करण्याचे निर्देश कृषी उपायुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिवंत शेतकऱ्यांना मयत दाखवल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित होते. विनायक सरनाईक यांनी तहसील कार्यालयात सरण रचण्याचा इशारा दिला होता तर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राम डहाके यांनी चिखली तालुक्यातील शेलोडी गावात शासनाचे डोळे उघडवण्यासाठी तिरडी आंदोलन केले होते. आंदोलनाला यश मिळाल्याचे समाधान आहे मात्र जोपर्यंत प्रक्रिया पुर्ण होऊन शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच असल्याचे राम डहाके म्हणाले.