चित्रपट निर्माते सुनील शेळके यांना प्रतिष्ठेचा सी. के. बोले समाजभूषण पुरस्कार जाहीर! २९ जूनला दादरमध्ये होणार पुरस्काराचे वितरण..
Jun 27, 2024, 18:53 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी व कोकण रेल्वेसाठी प्रस्ताव मांडणारे भंडारी समाजाचे मानबिंदू लोकहितवादी रावबहाद्दूर सी. के. बोले यांच्या नावे देण्यात येत असलेला प्रतिष्ठित लोकहितवादी रावबहाद्दूर सी. के. बोले समाजभूषण पुरस्कार २०२४ चित्रपट निर्माते सुनील शेळके यांना जाहीर झाला आहे.
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार असलेले रावबहाद्दूर सी. के. बोले यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठी, सार्वजनिक ठिकाण व पाणवठे सर्वांसाठी खुले करण्यासोबतच अनेक समाज सुधारणावादी कामे करणारे भंडारी समाजाचे मानबिंदू लोकहितवादी रावबहाद्दूर सी. के. बोले यांची २९ जून रोजी १५६ वी जयंतीचे औचित्य साधून तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने कला, सामाजिक कार्य, विज्ञान, उद्योग, वैद्यक, साहित्य, शिक्षण, पर्यावरण, क्रीडा, नागरिक सेवा, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दरवर्षी पुरस्काराचे वितरण करण्यात येते.
यातच यंदाचा लोकहितवादी रावबहाद्दूर सि. के. बोले समाजभूषण पुरस्कार २०२४ चित्रपट क्षेत्रात समाजप्रबोधनात उल्लेखनीय कामगिरी केली असल्याने अभिता फिल्म प्रोडक्शन कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण भंडारी मंडळ सभागृह, दादर (पश्चिम) मुंबई येथे २९ जून रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे आयोजक संतोष आंबेकर यांनी दिली.