गरिबांच्या पोटापाण्यावर पाय! बुलडाण्यात अतिक्रमण हटाव मोहिम जोरात; अवैध धंद्यावाल्यांना मात्र आसरा?

 
atikraman
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरात प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली आहे. मुख्य रस्त्यांवर दुकान थाटून आपल्या पोटाची खळगी भागवणाऱ्यांची  दुकाने हटवण्यात आली आहेत. शहराचे सौंदर्यीकरण  करण्यासाठी अतिक्रमण हटवण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी ही कारवाई म्हणजे गरिबांच्या पोटापाण्यावर पाय असल्याची प्रतिक्रिया जनमानसातून व्यक्त होत आहे. तशा आशयाचे निवेदन अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
   

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, स्टेट बँक ते जयस्तंभ चौक, जयस्तंभ चौक परिसर या भागात कित्येक वर्षांपासून छोट्या व्यवसायिकांनी दुकाने थाटली आहेत. मात्र आता ही दुकाने प्रशासनाच्या वतीने हटवण्यात आली आहे. शहराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी अतिक्रमण काढण्यात येत असल्याचे म्हणणे असले तरी हाच न्याय अवैध धंद्यावाल्यांना का नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात ठिकठिकाणी अवैध धंद्यावाल्यांनी अतिक्रमण करून त्यांचा  धंदा थाटला आहे. मात्र असे असले तरी त्यांचे अतिक्रमण मात्र अद्याप काढण्यात आले नाही. त्यामुळे गरिबांच्या पोटावर पाय अन्  अवैध धंद्यावाल्यांना आसरा असे चित्र दिसत असल्याने अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. काढायचे असेल तर सगळ्यांचे काढा, त्यात भेदभाव करू नका आणि खरा खुरा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या अशी मागणी जोर धरत आहे.