गांगलगावात शेतरस्त्यासाठी ६ दिवसांपासून उपोषण; प्रशासनाने ४ फुटांचा रस्ता दिला पण शेतकरी म्हणतात तेवढ्यात भागत नाही;

दोन उपोषण कर्त्यांची तब्येत बिघडली, दवाखान्यात हलवले! 

 
fkjh

चिखली(ऋषी भोपळे पाटील:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील गांगलगाव येथील ४ शेतकरी शेतरस्त्यासाठी उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आज ६ वा दिवस आहे. प्रशासनाच्या कारवाईने समाधान न झाल्याने शेतकरी उपोषण सोडायला तयार नाहीत. आज दोन उपोषण कर्त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना बुलडाणा येथे विद्यकिय उपचारासाठी हलविण्यात आहेत.

रोहडा - खैरव नकाशावरील शेतरस्ता खुला करून मिळवण्यासाठी २९ मे पासून शेनफड आनंदा सोळंकी, बेबाबाई शिवाजी म्हस्के, शिवाजी त्र्यंबक म्हस्के व निर्मला उत्तमराव म्हस्के असे चौघे शेतकरी उपोषणला बसले आहेत. न्यायालयाने रस्ता खुला करण्याचे आदेश याआधीच दिले होते. तहसीलदारांनी अंढेरा पोलीस स्टेशनला पत्र देऊन रस्ता खुला करण्यासाठी बंदोबस्त पुरविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार काल मोजणी करून रस्ता खुला करून देण्यात आला. मात्र केवळ ४ फुटांचा रस्ता खुला करून देण्यात आल्याने शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. ४ फुटांच्या रस्त्यावरून शेतात ट्रॅक्टर, अवजारे न्यायचे कसे असे उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले नाही. दरम्यान आज,३ मे रोजी दुपारी शेनफड आनंदा सोळंकी आणि बेबाबाई शिवाजी म्हस्के या दोघांची तब्येत बिघडली असल्याने त्यांना वैद्यकीय उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. जोपर्यंत आवश्यक तेवढा रस्ता खुला होत नाही तोपर्यंत जीव गेला तरी उपोषण सोडणार नाही असे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे.