Amazon Ad

शेतकऱ्यांनो शासकीय बँकांकडून पीक कर्ज घ्या; बँका टाळाटाळ करत असतील तर "हा" आहे उपाय! सावकाराच्या नादी लागू नका!

जिल्ह्यात अवैध व्याजाचा धंदा करणाऱ्या ५५ जणांवर गुन्हे दाखल;तुम्हाला सावकार त्रास देत असेल तर इथे करा तक्रार.....

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात सध्या समाधानकारक पाऊस झालेला नसला तरी शेतकऱ्यांकडून पेरणीची लगबग सुरू आहे. ६ ते १९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत,त्यावर दुबार पेरणीचे संकट आहे. दरम्यान शेतकऱ्यांना पेरणीसाठी पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. यंदा बुलडाणा जिल्हा प्रशासनाने १५०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट समोर ठेवले असून आतापर्यंत ४० हजार शेतकऱ्यांना ४५० कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासकीय बँकांकडून कर्ज घ्यावे, व्याजाचा धंदा करणाऱ्या सावकारांकडून कर्ज घेऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी पीककर्ज बाबत माहिती दिली. शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज उपलब्ध करून द्यावे. त्यांना सातत्याने बँकेत चकरा मारायला लावू नये. कर्ज वाटप करतांना शेतकऱ्यांना अडवणूक करू नये अशा सूचना बँकांना देण्यात आल्याचे ते म्हणाले. ज्या बँका शेतकऱ्यांना त्रास देतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना बँक पीक कर्ज वाटल करण्यास टाळाटाळ करीत असेल तर 7507766004 या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.पाटील यांनी केले आहे.
सावकाराच्या नादी लागू नका...
शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेऊ नये. कर्ज घ्यायचेच असेल तर परवानाधारक सावकारांकडून कर्ज घ्यावे.जिल्ह्यात ९२ परवानाधारक सावकार असून त्याची यादी तालुका निबंधक यांच्याकडे आहे. कोणताही अवैध सावकार कर्ज वसुलीसाठी तगादा लावत असेल, जमीन बळकावत असेल तर त्याची तालुका निबंधक किंवा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करावी. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ५५ अवैध सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात असल्याचेही डॉ.पाटील म्हणाले.