शेतकऱ्यांनो फळपीक विमा योजनेत सहभागी व्हा! फायदाच फायदा मिळवा; केळी,द्राक्ष, मोसंबी, आंबा, संत्रा, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आवर्जून वाचा...

 
Vvbb
बुलडाणा (जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येते. यावर्षीच्या आंबिया बहारामध्ये सहा फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या तीन वर्षासाठीच्या आंबिया बहारामध्ये आंबा, केळी, डाळिंब, द्राक्ष, मोसंबी आणि संत्रा या सहा फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना 2021 पासून लागू करण्यात आली आहे. यात अवेळी पाऊस, कमी तापमान, वेगाचा वारा, जादा तापमान, जास्त पाऊस आणि गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे व फळपिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यात येते.
अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळ पिके घेणारे यात कुळाने भाड्याने पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. सन २०२१-२२ पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार, तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकासाठी इच्छुक आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनूसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता 30 टक्के दरापर्यंत मर्यादित केला आहे. त्यामुळे 30 टक्के वरील विमाहप्ता राज्य शासन शेतकऱ्यांनी स्वीकारणे क्रमप्राप्त आहे.
या योजनेंतर्गत ३० ते ३५ टक्केपर्यंतचे अतिरिक्त ५ टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले आहे. ३५ टक्केवरील विमा हप्ता राज्य शासन आणि शेतकऱ्यांनी ५०-५० टक्के प्रमाणे भरावयाचे आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी जमीन भूधारणेच्या मर्यादित एका शेतकऱ्यास अधिसूचित फळ पिकासाठी ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येणार आहे. अधिसूचित फळपिकापैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहार यापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल, यात संत्रा, मोसंबी आणि डाळिंब फळांचा समावेश आहे.
केवळ उत्पादनक्षम फळबागानाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. फळपिकनिहाय निर्धारित केलेले हवामान धोके लागू झाल्यावर नुकसान भरपाई देय होते. विमा क्षेत्र घटक महसूल मंडळ राहील. बँकेकडून अधिसूचित फळपिकासाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असलेले शेतकरी कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची अंतिम मुदत फळपीक निहाय देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कर्जदार आणि बिगर कर्जदार योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था, बँक, आपले सरकार सेवा केंद्र, विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे, यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा द्राक्ष १५ ऑक्टोंबर २०२३, मोसंबी ३१ ऑक्टोबर २०२३, केळी ३१ ऑक्टोबर २०२३, संत्रा ३० नोव्हेंबर २०२३, आंबा ३१ डिसेंबर २०२३, डाळिंब १४ जानेवारी २०२४ ही आहे.
फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी बँक किंवा क्षेत्रीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.