बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर! चिखली तालुक्यातील हराळखेडची घटना; शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण!
Sep 21, 2023, 20:32 IST
चिखली( गणेश धुंदाळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना आज,२१ सप्टेंबरला चिखली तालुक्यातील हराळखेड येथे घडली. राजू एकनाथ गायकवाड(४८) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार राजू गायकवाड हे गावालगत असलेल्या त्यांच्या शेतात सोयाबीनला पाणी देण्यासाठी मध्यरात्री २ च्या सुमारास मोटार चालू करायला गेले होते. यावेळी शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने राजू गायकवाड यांच्यावर हल्ला चढवला. गायकवाड यांनी जोरजोरात आरडाओरड केल्याने व प्रतिकार केल्याने बिबट्याने पळ काढला. या हल्ल्यात शेतकरी राजू गायकवाड यांच्या हाताला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खामगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे दहशतीचे वातावरण आहे. या परिसरात दिवसा ढवळ्या अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
महावितरणने शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी...
शेतकरी राजू गायकवाड हे शेतात मोटार चालू करण्यासाठी गेले होते. दिवसा शेतातील वीज चालू असती तर हा अनर्थ घडला नसता. परिसरातील अनेक शेतकऱ्यांना रात्री शेतात पिकांना पाणी द्यायला जावे लागते, रात्रीच्या वेळी साप, विंचू यासह हिंस्र प्राण्यांचा धोका अधिक असतो..त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होण्याची गरज आहे.