चिखली तालुक्यातील डोंगरगाव , सावरखेड बु येथील शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन!काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंचाही आंदोलनात सहभाग; म्हणाले अपुरा वीजपुरवठा जीवावर उठलाय...
Updated: Nov 23, 2023, 16:45 IST
चिखली(गणेश धुंदाळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील डोंगरगाव व सावरखेड बु येथील शेतकरी महावितरणच्या कारभाराला कंटाळून जलसमाधी आंदोलनाला बसले आहेत. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे देखील या आंदोलनात सहभागी झाले.
शेतकऱ्यांनी ७ दिवसाआधी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत महावितरणला निवेदन दिले होते. मात्र त्यावर कोणत्याही उपाययोजना न झाल्याने शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेतला. अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे." राज्य आणि केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे सोयरसुतक नाही. हे सरकार उद्योगपतींचे आहे. शेतकरी मरायला टेकला तरी सरकारला देणेघेणे नाही. यंदा आधीच दुष्काळ आहे, त्यात अपुरा वीजपुरवठा शेतकऱ्यांच्या जीवावर उठलाय" अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी राहुल बोंद्रे यांनी दिली. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा वेळीच सुरळीत केला नाही तर काँग्रेस शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी त्यांनी दिला.