घाटावरील शेतकऱ्यांचे नगदीपीक धोक्यात! पिवळी पडलेली सोयाबीन उपटून फेकण्याची वेळ, पाऊस रुसल्याने शेतकरी झालाय हतबल! चांडोळच्या शेतकऱ्याने सोयाबीन उपटून फेकली..

 
soyabin
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. जिल्ह्यात एकीकडे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे तर दुसरीकडे पाऊस नसल्याने पिके धोक्यात आली आहे. घाटाखाली अतिवृष्टीने आणि पुराने पिकांसह जमिनींचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर घाटावर परिस्थिती त्याहून उलट आहे. घाटावर अल्प पावसामुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन धोक्यात आले आहे. त्यातच आता सोयाबीन पिकांवर मोझॅक रोग व पांढरी माशीचे आक्रमण वाढले आहे. किडीचे वाढते आक्रमण आणि पावसाने मारलेली दडी यामुळे सोयाबीन पिवळी पडून सुकत आहे. वारंवार फवारणी करुनही सोयाबीन पिकात कोणतीच सुधारणा होत असल्याने चांडोळ येथील राजू भवटे व किशोर सोनुने या दोन शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिवळे झालेले सोयाबीन पिक चक्क उपटून फेकले आहे. बुलढाणा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांवर सोयाबीन उपटून फेकण्याची वेळ आली आहे.यावर्षी पाऊस लांबल्याने पेरण्या उशीरा झाल्या. आता पेरणी होऊन महिनाभरापेक्षा अधिक काळ लोटला तरी अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. 

  खास करुन बुलडाणा आणि चिखली तालुक्यात पावसाने पाठ फिरविली आहे. पाऊसच नसल्याने पिकांची वाढ खुटली आहे. त्यात अज्ञात रोगामुळे सोयाबीन पिवळे पडत आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या पद्धतीने महागड्या कीटकनाशकाच्या फवारण्या केल्या. टॉनिक आणि खतेही देऊन पाहले. परंतु सोयाबीनची परिस्थिती सुधारण्याऐवजी सोयाबीन पिवळी पडून सुकत असल्याने शेतकरी वैतागले आहेत.बुलडाणा तालुक्यातील चांडोळ येथील किशोर श्रीराम सोनवणे आणि राजेंद्र भवटे यांनी त्यांच्या शेताती पिवळी पडलेली सोयाबीन उपटून फेकली आहे. शिवाय या परिसरातील विजय दौलत सोनवणे, अंकुश लिंबाजी सोनवणे, सुनील सखाराम सोनवणे, बळीराम भानुदास सोनवणे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन देखील पिवळी पडली असून हे शेतकरी देखील हतबल झाले आहेत. 

महागड्या औषधांच्या फवारण्या करुनही अपेक्षित परिणाम होत नसल्याने शेतकरी विवंचनेत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागकडे फिर्याद केली. या आधारे पिवळ्या पडलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी आलेले कृषी विभागाची टीम परिसरात दाखल झाली होती. बुलडाणा व चिखली तालुक्यातील इतर भागातही सोयाबीन पिवळी पडत असून शेतकरी हतबल झाले आहे.

काय करावे...?

सोयाबीन पिकांवर मोझॅक रोग व पांढरी माशीचे आक्रमण झालेले निदर्शनास येत आहे. पांढरी माशी पिवळ्या रंगाच्या पानावर आकर्षित होते. त्यामुळे शेतातील सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडल्यास त्यावर फ्लूनिका माईंड व थायोमिथोक्झामची फवारणी करुन पाहा, असा असा सल्ला बुलढाणा कृषी विभागातील कीटक शास्त्रज्ञ प्रशांत देशपांडे यांनी दिला आहे.