शेतकरी आंदोलन LIVE : आठवरून दोनशे झाले कसे?

नेत्याला एकटे सोडायचे नाही, शेतकऱ्यांचा निर्धार!
 
 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी १७ नोव्हेंबरपासून सुरू केलेलल्या अन्‍नत्याग सत्याग्रहाने आज, १९ नोव्‍हेंबरला तीनच दिवसांत व्यापक रूप धारण केले. रविकांत तुपकरांची प्रकृती खालावल्याने शेतकरी पेटून उठले. दिवसभरात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांनी चक्का जाम केला. सायंकाळी बुलडाण्यात आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. मात्र वेळीच तुपकरांनी हस्तक्षेप केल्याने आणि पोलिसांनीही सामंजस्याची भूमिका घेतल्याने अनर्थ टळला. मात्र तरीही आंदोलनस्थळी तणावपूर्ण शांतता आहे. दिवसभरात शेकडो शेतकऱ्यांनी तुपकारांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. काल, १८ नोव्हेंबरला रात्री सात ते आठ कार्यकर्ते आणि तीन-चार पोलीस कर्मचारी व्हरांड्यात मुक्कामाला होते. मात्र आज, १९ नोव्हेंबरच्या रात्री दोनशेच्या आसपास कार्यकर्ते, शेतकरी आंदोलनस्थळी मुक्कामासाठी पोहोचले आहेत. तेवढ्याच पोलिसांचा फौजफाटासुद्धा तुपकरांच्या निवासस्थानाभोवती आहे. कालच्या आठवरून आज दोनशेपर्यंत हा आकडा पोहोचला कसा, याची कारणे दिवसभरातील घडामोडींत आहेत. दिवसभरात घडलेल्या घटनांमुळे आंदोलनाची तीव्रता वाढली आहे.

ty

तीन दिवसांपासून उपाशी असल्यामुळे तुपकरांची तब्येत आज प्रचंड खालावली. सकाळी उठल्यानंतर ब्रश करताना तुपकरांना चक्कर आली आणि ते कोसळले. त्‍यांची साधी तपासणी करण्याचेही औदार्य जिल्हा प्रशासन दाखवत नव्हते ही वार्ता वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरली. त्यामुळे आपला नेता आपल्यासाठी लढतोय ही भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आणि जिल्हाभर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनात उत्‍स्फूर्त सहभाग घेतला.

बातम्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून क्षणाक्षणाचे अपडेट जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत होते. उपोषण मंडपात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी शेतकरी आंदोलनास्‍थळाकडे येऊ लागले. आंदोलनाची व्याप्ती वाढत असल्याचे पाहून तहसीलदार आणि जिल्हा कृषी अधिकारी भेटायला आले. मात्र ठोस निर्णय नसल्याने तुपकरांनी त्यांना माघारी पाठवले. दुपारी रविकांत तुपकरांच्या आईला त्‍यांची तब्‍येत पाहून अश्रू अनावर झाले. माझ्या मुलाला काहीही झाले तर सरकार जबाबदार राहील. माझा मुलगा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी  लढतोय तो गुंड नाही, माझ्या पोटात तोडतेय... असे म्हणताना तुपकरांच्या आईंना अश्रू अनावर झाले. ही बातमी, त्‍यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ पाहणाऱ्यांच्याही डोळ्यांत पाणी आले आणि आंदोलनाची दखल न घेणाऱ्या सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आक्रोश निर्माण झाला. याचा व्हायचा तोच परिणाम झाला.

प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रफिक शेख यांनी अंगावर पेट्रोल घेत तुपकरांच्या निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्‍यामुळे वातावरण चिघळले. रफिक शेख यांना घ्यायला आलेल्या रुग्‍णवाहिकेवरही दगडफेक झाली. दंगाकाबू पथकाला पाचारण करण्यात आले. पोलीस आणि शेतकऱ्यांत झटापट झाली. पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक झाली. चिखली रोडवर वाहने अडवण्यात आली. अंगात शक्ती नसताना तुपकर रस्त्यावर आले. त्‍यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. पोलिसांनाही लाठीचार्ज आणि धरपकड करू नये, असे आवाहन तुपकरांनी केल्याने वातावरण लवकर निवळले. मात्र तोपर्यंत दोनशेपेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा तुपकरांच्या निवासस्थानी  जमला. राज्यभरातील शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन तुपकरांनी केले. अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. या बातम्या जिल्हाभर पसरल्या. आता आपल्या नेत्याला एकटे सोडायचे नाही. आपणही उपोषण मंडपातच थांबायचे असा निर्धार शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे काल आठ असलेली संख्या आज दोनशेपर्यंत जाऊन पोहोचली. रात्री अकराच्या सुमारास मंडपात पाय ठेवायला जागा नव्‍हती.