भक्तीमहामार्गासाठी खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे एसडीओंना समर्थन पत्र! समर्थनाचे कारण काय? वाचा...
Aug 16, 2024, 11:44 IST
शेगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शासन प्रस्तावित सिंदखेडराजा ते शेगाव या भक्तीमहामार्गाला खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी समर्थन दिले आहे.एकीकडे आ.श्वेता महाले, आमदार डॉ.शिंगणे यांनी या महामार्गाला विरोध असल्याचं म्हटलंय. चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील या महामार्गाला विरोध केलाय, त्यासाठी आंदोलने केली मात्र शेतकऱ्यांचा एक गट या महामार्गाच्या समर्थनात उभा राहत असल्याचं दिसतय. दोन आठवड्यांपूर्वी देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील समर्थनाचे एक पत्र एसडीओंना दिले होते.
खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी खामगाव यांना भक्ती मार्ग व्हावा यासाठी समर्थन पत्र दिले आहे. त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा ते शेगाव ला जोडणाऱ्या भक्ती महामार्गाला सरकारकडून मान्यता मिळाल्याने लाखो भाविक आणि शेतकरी आनंदी झालेला आहे. भक्ती महामार्गाला आवश्यक जमीन देण्यासाठी शेतकरी वर्ग तयार आहे. म्हणून सरकारने होवू घातलेल्या महत्त्वाकांशी प्रकल्पाला आमची सर्व शेतकऱ्यांची संमती आहे. शासनाने तत्परतेने भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात - लवकर पार पाडावी, समृद्धी महामार्गाला लागून होत असलेल्या भक्ती महामार्गालाही समृद्धी महामार्ग प्रमाणे पाचपट मोबदला मिळावा अशी मागणीही या समर्थन पत्रात करण्यात आली आहे.