मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्याचा आक्रोश! म्हणाले, बसून बसून आमचे टोंगळे दुखायले; मुख्यमंत्री आमचं एकतील का? पीक विम्याची रक्कम अजूनही मिळाली नाही; मलगीच्या शेतकऱ्याची व्यथा

 
Ghvch
इसरुळ ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. १२ वाजून २० मिनिटांनी मुख्यमंत्री कार्यक्रम स्थळी पोहचणार असल्याचे पूर्वनियोजित होते, मात्र २ वाजून उलटल्यानंतर देखील मुख्यमंत्री कार्यक्रम स्थळी पोहचले नव्हते. दरम्यान मुख्यमंत्र्यांची वाट पहात अनेक जण ताटकळत बसले होते. काही जण थकले तर काही झोपल्याचे दिसले. याच दरम्यान एका शेतकऱ्याने चांगलाच आक्रोश केला. पीक विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्याने आक्रोश केल्याचे दिसले.

बसून बसून आमचे टोंगळे दुखायले, मुख्यमंत्री त्यांचं भाषण सांगणार की आमचं ऐकणार असं म्हणत चिखली तालुक्यातील मलगी येथील शेतकरी संजय किसन सावंत आक्रोश करीत होते. टिव्हीवर आमच्या बातम्या दिसत नाहीत, पत्रकार मुख्यमंत्र्याकडे कॅमेरे लावून आहेत, आमचं मात्र कुणीच ऐकत नाही असं शेतकरी सावंत म्हणत होते.

मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी सकाळी १० वाजेपासून त्यांनी स्टेजजवळ जागा पकडली होती, मुख्यमंत्र्यांच्या वाटेकडे ते डोळे लावून होते. संजय सावंत यांची मलगी शिवारात ३ एकर शेती आहे.  त्यांच्या शेतात त्यांनी सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली होती. १४५० रुपये त्यांनी पीक विमा भरला होता. अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर त्यांनी विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार केली होती, मात्र पंचनामे होऊनही त्यांना १ रुपया देखील परतावा मिळाला नाही. आपल्याला पीक विमा मिळाला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी जरा आमच्याकडे पहावे असेही शेतकरी सावंत म्हणत होते.