Exclusive : निसर्गाच्या तांडवात जिल्ह्यात ३७०० हेक्टरवरील पिके जमीनदोस्त! ७ जनावरे दगावली

 
file photo
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः निसर्गाचा तडाखा किती प्रलयंकारी असतो, मानव त्याच्यापुढे किती हतबल होतो याचा प्रत्यय जिल्हावासीयांना पुन्हा एकदा आलाय! आज, २९ डिसेंबरला सकाळी संपलेल्या गत्‌ २४ तासांपैकी काही तास शेतकऱ्यांसाठी होत्याचे नव्हते करणारे ठरले. निसर्गाच्या या झंझावातात तब्बल ३ हजार ६९७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची अतोनात नासाडी झाली असून, ७ मुक्या जनावरांचे बळी गेले!

अर्थात हा प्राथमिक अंदाज असून प्रत्यक्षात नुकसानीचा आकडा नक्कीच जास्त असणार हे उघड आहे. यामुळे रब्बी हंगामाच्या प्रारंभीच हजारो शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. २८ डिसेंबरला ढगाळ वातावरण होते. मात्र दुपारी काही क्षणातच पावसाळी वातावरण तयार होऊन जिल्ह्यात संमिश्र पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत हजेरी लावणाऱ्या या पावसाला सर्वत्र सोसाट्याचा वारा, तर काही ठिकाणी गारपिटीची साथ होती. प्राथमिक पाहणीत ३६९७ हेक्टरवरील मका, हरभरा, गहू, तूर, ज्वारी या पिकांची नासाडी झाली. याशिवाय कांदा, भाजीपाला, केळी, पपई, बिजोत्पादन कांद्याचे देखील लक्षणीय नुकसान झाले.
सात जनावरांचा कोळसा
दरम्यान, कोसळधार पाऊस, गारपिटीमुळे ७ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मेहकर तालुक्यातील मोहना येथील सुरेश आडे यांच्या गोरक्षणमधील ६ गाई व एका वासराचा यामध्ये समावेश आहे.

धुक्याने गारठला जिल्हा; बहरात आलेल्या गहू, हरभरा आणि आंब्याला फटका
आज सकाळी धुक्याची चादर पसरल्याने जिल्हाभरातील शेतकऱ्यांची उभी रब्बी पिके, भाजीपाला पिके संकटात सापडली आहेत. गहू, हरभरा, तूर, बहरात आलेला आंबा, कांदा, मिरची आणि अन्य भाजीपाला पिकावर धुक्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. रब्बी पिकांकडून शेतकऱ्यांना अपेक्षा होती. या नुकसानीचे तातडीने पंचनामे  करण्याचे आदेश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

कृषी शास्त्रज्ञ म्हणतात...
धुके पडल्याने तापमानात घट होते. त्यामुळे नर फुलांमधील परागकण बाहेर पडत नाहीत व मादी फुलांना परागकण उपलब्ध होत नसल्याने फुले करपतात व गळून पडतात. त्यामुळे फुलोऱ्यामध्ये असलेल्या पिकांवर धुक्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे जिल्ह्यातील गहू, हरभरा, कांदा, आंबा व भाजीपाला पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून धुक्याचा अंदाज घेत शेतकऱ्यांनी पहाटे शेताच्या बांध्यावर पालापाचोळा जाळून धूर करावा. ज्यामुळे तापमानात वाढ व्हायला मदत होईल.
- डॉ. चंद्रकांत जायभाये, कृषी शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा

बुलडाणा लाइव्हकडे फोनवर व्यक्‍त झाले शेतकरी...
काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत अनेक शेतकऱ्यांचे बुलडाणा लाइव्हला फोन आले. त्‍यांनी शेतीतील नुकसानीची माहिती देऊन आमच्या मदतीची मागणी शासन, प्रशासनापर्यंत पोहोचवा, असे आर्जव केले. मोहना बुद्रूक (ता. मेहकर) येथील सुभाष हिरामण चहाण यांच्या तीन एकरातील पपईचे नुकसान झाले असून, २ लाख रुपयांचे उत्‍पन्‍न अपेक्षित होते, असे त्‍यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले. टाकरखेड हेलगा (ता. चिखली) येथील पुरुषोत्तम रुपराव जाधव यांच्या शेतातील केळीची झाडे गारपिटीमुळे जमिनदोस्त झाली आहेत, असे जाधव यांनी सांगितले. मोताळा तालुक्‍यातील पिंपळगाव नाथ येथील शेतकरी गोविंद गजानन घोरपडे यांनी सव्वा दोन एकरातील मका पार झोपून गेल्याचे सांगितले.

हेही वाचा : गारपिटीनं सारी मका उद्‌ध्वस्त केली, आता मी कसं जगू?; मोताळा तालुक्‍यातील हताश शेतकरी गोविंद घोरपडेंचा बुलडाणा लाइव्हला फोन, कालपासून आलेत शेकडो शेतकऱ्यांचे फोन!!