खळबळजनक! दोन शेतकऱ्यांवर वन्यप्राण्याचा हल्ला! कोणी म्हणे वाघ कोणी म्हणे बिबट्या!शेगाव तालुक्यातील वरद ची घटना; वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल!
Wed, 8 Mar 2023

शेगाव( संतोष देठे पाटील:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातील वरद येथे वन्यप्राण्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना आज,८ मार्चच्या सकाळी १० वाजेदरम्यान घडली. हल्ला करणारा वाघ की बिबट्या याबाबत अजून संभ्रम आहे. वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार शेगाव तालुक्यातील डोलारखेड येथील शेतकरी सुरेश गजानन देठे(३५) व एकनाथ दिनकर लोड (३२, रा. वरद,ता शेगाव) दोघे वरद शिवारातील ज्ञानगंगा नदीच्या काठावरील शेतात मका कापण्यासाठी गेले होते. यावेळी वन्य प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला, या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी तिथे धाव घेतली.
दोघाही जखमी शेतकऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून शोधमोहीम सुरू केली आहे. दरम्यान घटनास्थळाचे काही व्हिडिओ समोर आलेले असून चित्रीकरणात डरकाळीचा आवाज स्पष्ट ऐकू येत असून ही डरकाळी वाघाची की बिबट्याची हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.