उत्‍पादन शुल्क विभागाच्या जिल्ह्यात धडाकेबाज कारवाया!

अवैध दारू प्रकरणी ८८ गुन्हे नोंद, ८९ आरोपींना अटक; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चालू डिसेंबरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने विभागीय उपायुक्त मोहन वर्दे  आणि अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू प्रकरणी ८८ गुन्हे दाखल केले असून, ८९ आरोपींना अटक केली आहे. ९ वाहनांसह एकूण २८ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

थर्टिफर्स्टला जिल्ह्यात दारूचा महापूर वाहतो. अवैध दारूही मोठ्या प्रमाणावर विक्री होते. त्‍यामुळे उत्‍पादन शुल्‍क विभागाने अवैध दारूवर कारवायांचा धडाका लावला. काल, २९ डिसेंबर रोजी प्र. निरीक्षक एन. के मावळे, दुय्यम निरीक्षक आर. के फुसे, एस. डी. चव्हाण यांच्या पथकाने शेंदला (ता. मेहकर) येथील संतोष सरदार याच्या राहते घरी छापा मारला. या ठिकाणी गोवा राज्य निर्मित व विक्रीसाठी असलेली, राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेली विदेशी दारूच्या ३६ बाटल्या, राज्यातील मॅकडॉल क्रमांक १ व्हिस्की या ब्रँण्डच्या जुन्या बाटल्यामध्ये भरलेल्या बनावटी विदेशी मद्याच्या २२३ सिलबंद बाटल्या, मॅकडॉल व्हिस्कीचे बनावट नवीन १५४० बुचे व ४२४ रिकाम्या जुन्या बाटल्या व एक हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल व आरोपीचे दोन मोबाइल असा एकूण १ लाख ४२ हजार ८१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संतोष संपत सरदार (ह. मु. शेंदला ता. मेहकर) व प्रमोद भुजंग सरदार (रा. रामनगर, मेहकर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या कारवाईत जवान प्रदीप देशमुख, अमोल सुसरे, गणेश मोरे, प्रफुल्ल साखरे, शरद निकाळजे व महिला जवान सौ. शारदा घोगरे आदी सहभागी झाले होते. २७ डिसेंबरला चिखलीत मोठ्या प्रमाणावर बनावट मद्यसाठा जप्त केला होता. शेंदला आणि चिखलीत बनावट विदेशी दारू पकडण्यात आल्याने थर्टिफर्स्टला अशा प्रकारची बनावट विदेशी विकली जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यापूर्वी बनावट मद्य सेवनामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर जिवितहानी होऊन शेकडो लोकांचा मृत्यू झालेला आहे.

बनावट मद्यामुळे गंभीर स्वरूपाचे आजार तसेच गंभीर स्वरूपाचे अपंगत्व येण्याची संभावना असते किंवा अन्य दुर्घटना होण्याची दाट संभावना आहे. त्‍यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.  उत्पादन शुल्क विभागाचा मद्यसेवन परवाना प्राप्त करून केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी व सेवन करावे. त्याचप्रमाणे पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच यांनी बनावट मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री होत असल्यास या विभागास टोल फ्री क्रमांक 1800833333 वर किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर किंवा  excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी, असे आवाहन अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.