रोही प्राण्यांपासून पिकाचे रक्षण रक्षण करण्यासाठी शेताभोवती विजेची तार लावली! रात्रीच्या अंधारात शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला; लोणारची खळबळजनक घटना

 
Hdhd
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात ठीकठिकाणी सध्या जंगली प्राण्यांचा हैदोस सुरू आहे. शेतकऱ्यांनी पेरलेल्या कोवळ्या पिकांवर रोह्यांचा कळप झडप घालतो अन् काही क्षणात संपूर्ण पीक उध्वस्त होते. शासनाकडून शेतकऱ्यांना फारशी मदत मिळत नाही, त्यामुळे रात्र रात्र शेतकऱ्यांना शेतात जागून पिकांचे राखण करावे लागते. काही शेतकऱ्यांनी आता यावर तोडगा काढला, दररोज संध्याकाळी शेतकरी शेताभोवती तार लावतात, त्यात विजेचा प्रवाह सोडतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तार काढून घेतात. दरम्यान लोणार येथे पिकांचे रक्षण करण्यासाठी लावलेल्या विजेच्या तारात अडकून शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार शेख कय्युम शेख नुर महंमद (३५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कय्युम रात्रीच्या वेळी लोणार येथून काही अंतरावर असलेल्या काळ्या पाणी तलावात मासे, खेकडे पकडण्यासाठी गेला होता. दरम्यान सुदेश रामराव मापारी, शिवा रामराव मापारी यांनी शेतात रोही येऊ नये म्हणून शेताभोवती तार टाकून त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. शेख कय्युम याला याबाबत कोणतीच कल्पना नव्हती.
   या तारेला स्पर्श झाल्याने शेख कय्युम याचा मृत्यू झाला. सकाळी तार काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना शेख कय्यूम याचा मृतदेह दिसला. कुजबुज होऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह उचलून ४०० मीटर अंतरावर टाकण्यात आला. मात्र कितीही झाकले तरी काही गोष्टी उघडकीस येतातच, या प्रकरणाची चर्चा होऊ लागल्यानंतर तारांत वीज प्रवाह सोडल्याचे समोर आले. शेख कय्यूमच्या पत्नीने लोणार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून सुरेश रामराव मापारी, शिवा रामराव मापारी व चतुर्भुज फोलाने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास सुरू आहे.