अतिवृष्टीने सोयाबीन गेली आता अवकाळीने गहू झोपला, हरभरा फुटला! जिल्हाभर अवकाळी पावसाचा धुमाकूळ! साखळीत वीज पडून १६ मेंढ्या दगावल्या! आणखी "इतके" दिवस पडणार पाऊस!
Tue, 7 Mar 2023

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गेल्या दोन - तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याने सुद्धा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. काल,६ मार्चपासून ती शक्यता खरी ठरली. जिल्ह्यातील विविध भागात टप्प्याटप्प्याने अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात शेतातील उभ्या ,गहू हरबऱ्याचे मोठे नुकसान झाले. बुलडाणा तालुक्यातील साखळी येथे वीज पडून १८ मेंढ्या दगावल्याची घटना घडली.
याआधी खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडातील घास हिरावला होता. अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नसतांनाच पुन्हा एकदा दुसरे संकट कोसळले आहे. ज्या शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी लवकर केली होती त्यांचा गहू, हरबऱ्याची काढणी झाल्यामुळे ते शेतकरी या तडाख्यातून वाचले असले तरी उशिरा पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला.
सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, बुलडाणा, खामगावसह जिल्ह्यातील तेराही तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुलडाणा परिसरात ६ मार्चच्या रात्रीपासून ७ मार्चच्या पहाटेपर्यंत संततधार पाऊस होता. दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात ९ मार्च पर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे.