नशेत लावला फोन, पोलीस आले अन् पितळ उघडे पडले ; देऊळगाव साकर्शा येथील सुनील नवत्रे विरुध्द गुन्हा!

 
जानेफळ
जानेफळ (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): 
कारण नसताना नशेत पोलिसांना फोन करने देऊळगाव साकर्शा येथील सुनील नवत्रेला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी त्याला अद्दल घडवली असून  त्याच्याविरुद्ध जानेफळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र पोलीस दलाने नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने तसेच आपात्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत उपलब्ध व्हावी. या हेतूने डायल ११२ ही प्रणाली सुरू केली आहे. मात्र दारूच्या नशेत या प्रणालीचा विनाकारण उपयोग केल्याचा प्रकार समोर आला आहे. जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील देऊळगाव साकर्शा येथील सुनील उर्फ पिंटू हरिभाऊ नवत्रे याने काल ७ मार्चच्या रात्री कारण नसताना ११२ हा क्रमांक डायल केला. त्यांनतर जानेफळ पोलीस ठाण्यात हा फोन लागला. त्याने मदत पाहिजे असे सांगून पोलिसांना बोलावून घेतले. काही वेळानंतर लगेचच कॉन्स्टेबल राजू चव्हाण आणि चालक सफौ.गणेश गाभने देऊळगाव साकर्शा गावात पोहचले. त्यांनतर गावातील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, व कॉलरच्या नातेवाईकांकडे त्यांनी माहिती दिली. ज्याने फोन केला त्याचा शोध सुरू झाला. त्यांनतर फोन लावणारे सुनील नवत्रे हे गावातील बसस्थानक परिसरात दिसून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी करायला सुरुवात केली. फोन का लावला ? काय मदत पाहिजे असे नवत्रे यांना विचारले असता त्यांनी कुठलेही संयुक्तिक अथवा वैध कारण सांगितले नाही. त्यावेळी ते दारूच्या नशेत होते. कॉल देखील नशेत असताना केल्याचे स्पष्ट झाले. सुनील नवत्रे याने विनाकारण पोलिसांना कॉल करून दिशाभूल केल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार ११२ प्रणालीचा गैरवापर केल्याप्रकरणी त्याच्या विरुध्द जाणेफळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.