जिल्हा विकास आराखड्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटीलांनी मागविल्या सुचना! पत्रकारांची मते घेतली जाणून! कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार..

 
jkjf

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह  वृत्तसेवा):  देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर होण्यासाठी जिल्ह्याची बलस्थाने ओळखून जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील जाणकारांनी सूचना द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी काल, केले.जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी जिल्हा विकास आराखड्यासंदर्भात पत्रकारांशी विचारविनीमय केला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड उपस्थित होते.

डॉ. पाटील यांनी, जिल्ह्याचे बलस्थान ओळखून येत्या काळात त्यानुसार विकासाचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रामुख्याने कृषि क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करून त्यात सुधारणा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात महत्वाच्या क्षेत्रात गुंतवणूक करून नागरिकांचे उत्पन्न वाढविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांचे राहणीमान सुसह्य होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील कृषि, पर्यटन, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक विकासासाठी या विविध क्षेत्रातील जाणकारांची मते जाणून घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील कृषि उत्पादनावर याच ठिकाणी प्रक्रिया होणे गरजेचे आहे. त्यासाठी याठिकाणी गुंतवणूक झाल्यास रोजगारनिर्मिती होऊन आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यात कुशल मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. अशा प्रकारच्या सूचना अभ्यासकांनी नोंदवाव्यात. जिल्ह्यातील नागरिक, संस्था आणि आस्थापना यात योगदान देऊ शकतील. केंद्र शासनाने सन २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प केला आहे.

भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उदिष्ट्य जाहीर केले आहे. सन २०३० पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्ट, तसेच २०४७ पर्यंत संपूर्णपणे विकासित राष्ट्र होणे गरजेचे आहे. विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केल्याने आर्थिक विकासासाठी विचारपूर्वक आणि विशिष्ट दृष्टीकोन विकसित करणे शक्य होईल, असा सर्वसमावेशक विकास राहणार आहे. तसेच शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनांमधील असमानता आणि जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज सर्व बाबी विचारात घेऊन प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी संभाव्य गुंतवणूक आणि विकासाला चालना देऊ शकणाऱ्या बाबीबाबत नागरिकांचे अभिप्राय घेतले जाणार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी कृषी आणि संलग्न सेवा, वस्तूनिर्माणासह उद्योग, जलसंधारण, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, पर्यटन आदी क्षेत्रांच्या वृद्धीबाबत अभिप्राय. शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करावयाचे आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी करावयाच्या उपाययोजना आणि अभिप्राय जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.