जिल्हाधिकारी डॉ पाटील यांची बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट! म्हणाले,कृषी प्रक्रिया उद्योगावर व्यापाऱ्यांनी भर द्यावा;

शेतकऱ्यांना जास्तीचे दर मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत! कापसाच्या विषयावर व्यापाऱ्यांना केले "हे" आवाहन
 
भद
बुलडाणा(लाइव्ह ग्रुप नेटवर्क):कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हक्काचं दालन आहे. मात्र आपल्या जिल्ह्यातील कृषीमाल हा पर जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी जातो. त्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांनी कृषी प्रक्रिया उद्योग उभारून इथल्या शेतमालावर इथेच प्रक्रिया करून तो विकण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवरच पिकाला जास्तीचे दर मिळतील. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी देखील कुठल्याही आमिषाला बळी न पडता बाजार समितीमध्ये आपला कृषी माल विक्रीसाठी आणावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले. बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीला आज ४ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी परिसराची संपूर्ण पाहणी केली. सुरुवातीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांनी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आधीची परिस्थिती आणि गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये बुलढाणा बाजार समितीच्या झालेला विकासात्मक बदल असा एकंदरीत आढावा सभापती जालिंदर बुधवत यांनी जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्यासमोर मांडला. 
ब्ध
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी देखील बाजार समितीच्या परिसरामध्ये गोडाऊन व्यवस्था, शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी प्रक्रिया आणि शेतमाल तारण योजनेच्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेतली . याप्रसंगी त्यांनी व्यापाऱ्यांची बैठक देखील घेतली. ते म्हणाले, शेतकऱ्यांना पिण्याचे पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी व्यवस्था या ठिकाणी आहे. मात्र अधिकचे झाडं या परिसरामध्ये लावून सावलीची व्यवस्था वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी बाजार समितीला त्यांनी सूचना केल्या. शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण योजना राबवण्यासाठी बाजार समितीला त्यांनी सूचना केल्या. शिवाय बीओटीवर गोडाऊन व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. जेव्हा हंगाम असतो तेव्हा कृषी मालाला ती गोडाऊन देण्यात यावेत. हंगाम कमी झाल्यानंतर कृषी विषयक माल त्यामध्ये आपण ठेवू शकतो आणि जेव्हा उन्हाळा किंवा हंगामाचे दिवस संपतात तेव्हा कृषी विषयक अन्य मालाला हे गोडाऊन आपण भाड्याने देऊ शकतो. अशा सूचनाच जिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी बाजार समिती प्रशासनाला केल्या. व्यापारी बांधवांनी शेतकऱ्यांना जास्तीचे दर मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असेही जिल्हाधिकारी डॉ.पाटील म्हणाले.
  बुलडाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस ही मुख्य पीक सध्या आहेत. मात्र इथे कापसावर प्रक्रिया उद्योग नाहीत. इथला कापूस देखील हा बाहेर जातो आणि सोयाबीन देखील बाहेर जिल्ह्यांमध्ये जाते. त्याचा ट्रान्सपोर्ट खर्च हा व्यापाऱ्यांना अधिकच द्यावा लागतो. त्यामुळे प्रधानमंत्री उद्योग योजना, मुख्यमंत्री स्वयंम रोजगार योजनेच्या माध्यमातून प्रोसेसिंग युनिट किंवा कापूस ते कापड असा एखादा प्रक्रिया उद्योग जर उभा केला किंवा त्या प्रकारामध्ये छोटे उदयोग उभे राहीले तर त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल आणि शेतकऱ्यांना देखील अधिकचा दर स्थानिक पातळीवर मिळण्यास मदत होईल. त्यामुळे व्यापाऱ्यांनी क्षमता वाढवून जिल्ह्याच्या रोजगार क्षेत्रामध्ये वृद्धी करावी. त्यामागे त्यांचादेखील मोठा फायदा होऊ शकतो असेही डॉ. किरण पाटील यावेळी म्हणाले.  
   यावेळी तहसीलदार रुपेश खंडारे, सहाय्यक निंबधक राजु हिवाळे , बाजार समितीचे संचालक राजु मुळे, लखन गाडेकर, संजय दर्डा, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष जितेंद्र दर्डा, बाजार समिती सचिव वनिता साबळे, व्यापारी गौतम बेगाणी, शदर व्यवहारे, विठ्रठल येवले, सुभाष कोठारी, कैलास केनकर, बाळु सिरसाट, नितेश मानमोडे, नंदकिशोर सावजी, कैलास भडेच तसेच अडते, व्यापारी, हमाल, मापारी, शेतकरी वर्ग व कर्मचारी यांची उपस्थिती होती.