जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटलांकडून कार्यालयांची पाहणी! जुन्या इमारतींची दुरुस्ती करण्याच्या सूचना; आणखी बरेच होणार बदल..

 
kdkdk

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विविध विभागांची पाहणी केली. प्रामुख्याने परिसरातील जुन्या इमारतीमधील विभागांची पाहणी दुरूस्ती आणि देखभालीच्या सूचना यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास केली.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी पाणीटंचाई, भूसंपादन, नोंदणी शाखा, नैसर्गिक आपत्ती, सेतू, बैठक हॉल, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे दालन, अभिलेख कक्ष आदीची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील विंचनकर, उपजिल्हाधिकारी शरद पाटील, तहसिलदार संजिवनी मोफळे, उपविभागीय अभियंता श्री. एकडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी सध्या असलेल्या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी. रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडांच्या कुंड्या ठेवण्यात याव्यात. तसेच खुल्या जागेत वृक्षारोपण करावे. जुन्या इमारतीमधील मोडक्या दरवाजे आणि खिडक्या बदलविण्यात याव्यात. नवीन खिडक्या बसविताना त्या उघडणाऱ्या असाव्यात. नोंदणी शाखेचे कामकाज संगणकीकृत करण्यावर भर देण्यात यावा, यासाठी आवश्यक असणारी सुविधा उपलब्ध करून ई-ऑफीस प्रणालीचा उपयोग कराव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

अभिलेख कक्षामधील उपलब्ध कागदपत्रे स्कॅन करून जतन करण्यात यावीत. तसेच ही कागदपत्रे सहज शोधता येतील, यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. इमारतीमधील नादुरूस्त भागाची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी. तसेच इमारतीमध्ये दुरूस्तीची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी. तसेच नादुरूस्त आणि उपयोगात नसलेली संगणक आणि इतर साधने जमा करून त्याची विल्हेवाट करावी. इमारतीची स्वच्छता करण्यासोबतच नागरिकांना सोयीचे होईल, अशी व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.