बचत गट प्रदर्शनीची जय्यत तयारी दिशा फेडरेशनचे आयोजन! कार्यक्रमस्थळाची जयश्रीताई शेळके यांनी केली पाहणी

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्यावतीने ४ व ५ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय महिला उद्योजक तथा बचत गट प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु असून २९ ऑक्टोबर रोजी संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन तयारीची पाहणी केली. 
Stage
येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्रांगणात ही बचतगट प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी उभारण्यात येणारे मुख्य स्टेज, सभा मंडप, लोकप्रतिनिधींची व मान्यवर मंडळींची बैठक व्यवस्था, येण्या-जाण्याचे मार्ग, बैठक व्यवस्था, लावण्यात येणारे विविध स्टॉल याबाबतच्या नियोजनाची माहिती जयश्रीताई शेळके यांनी जाणून घेतली. कार्यक्रमास येणाऱ्या नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच कार्यक्रमस्थळी पाणी, वाहनतळ, स्वच्छतागृह, कचरापेटी यासह इतर सुविधांचे व्यवस्थित नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महिलांची राहणार प्रचंड उपस्थिती
दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनसोबत जिल्ह्यातील १४०० बचत गट जुळलेले आहेत. फेडरेशनच्या माध्यमातून या बचतगटांना अर्थसहाय्य, बाजारपेठ, प्रशिक्षण, मार्गदर्शन, जाहिरात आदी सुविधा पुरवण्यात येतात. याद्वारे अनेक महिलांनी स्वतःचे व्यवसाय उभारुन प्रगती साधली आहे. दिशा फेडरेशनच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय बचत गट प्रदर्शनीत जवळपास २०० स्टॉल लावण्यात येणार आहेत. उदघाटन कार्यक्रमाला प्रचंड संख्येने महिला उपस्थित राहणार आहेत. त्याअनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे.