दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनची कार्यशाळा उत्साहात! जयश्रीताई शेळके म्हणाल्या, बचतगट महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणारी चळवळ

 
Vhmmg
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बचतगटांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास उंचावणे, बचतीची सवय, आर्थिक गुंतवणुकीचे महत्व, उद्योजकता आदी गुणांचा विकास झाला आहे. बचतगट ही महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणारी चळवळ आहे, असे प्रतिपादन दिशा बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष तथा कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी केले. 
दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्यावतीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त २६ सप्टेंबर रोजी राजर्षी टॉवर शेजारील सभागृहात आयोजित महिला बचतगट कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना जयश्रीताई शेळके म्हणाल्या, बुलडाणा हा राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे. जिजाऊ आपली अस्मिता आहे. महिलांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करावा. कृतीतून आदर्श निर्माण करावा, असे आवाहन केले. तसेच उपस्थित महिलांना बचतगटाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. 
प्रारंभी महानायिकांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत सहभागी बचतगटांना रेकॉर्ड वाटप करण्यात आले. महिलांना रेकॉर्ड भरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी आई महिला बचतगटाला १ लाख १० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. 
कार्यशाळेमध्ये विशाखा महिला बचतगट, स्वामीनी महिला बचतगट, आई महिला बचतगट, सानिया महिला बचतगट, ख्वाजा महिला बचतगट, सायरा महिला बचतगट, रोशनी महिला बचतगट, सुकेशनी महिला बचतगट, धनश्री महिला बचतगट, लक्ष्मी महिला बचतगट, आसरा महिला बचतगट, ताज महिला बचतगट, तनिशा महिला बचतगटाच्या महिला सहभागी झाल्या. संचलन पूजा शेळके यांनी तर आभार स्मिता वऱ्हाडे यांनी मानले.