स्वच्छतेसाठी मान्यवरांनी हाती घेतला झाडू!सार्वजनिक उत्सव समितीची शहरात स्वच्छता मोहीम

 
sandip shelke

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  राष्ट्रपिता महात्मा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने १५ एप्रिल रोजी सकाळी शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रातील मान्यवर स्वच्छतेसाठी सरसावले. 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी सायंकाळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या संख्येने भीमसैनिक मिरवणुकीत सहभागी झाले. प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक काढण्यात आली. एकाच वेळी हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. शहराच्या स्वच्छतेला झळ पोहचू नये यासाठी साफसफाई मोहीम राबविण्यात आली. 

'आपले शहर, स्वच्छ शहर' हा नारा देत सकाळी शहरातील प्रमुख चौकात हाती झाडू घेऊन साफसफाई करण्यात आली. यावेळी बुलडाणा अर्बनचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर, नगर पालिका मुख्याधिकारी गणेश पांडे, राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले, ऍड. अमोल खरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.