निवडणुकीच्या धामधुमीनंतर नेत्यांची संवेदशीलता हरवली?. शहिद जवान नागेश राक्षेच्या कुटुंबियांना कुणी विचारेना! संदीप शेळके अन् ॲड.शर्वरी तुपकर मात्र धावून गेल्या..
Apr 29, 2024, 09:51 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच गाजली. २६ एप्रिलला मतदान झाले, त्याआधी प्रचार कालावधीत आपले वेगळेपण दिसावे म्हणून नेत्यांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात होत्या..त्याच्या बातम्यादेखील माध्यमांत छापून येत होत्या..आपण संवेदनशील असल्याचा आव नेत्यांकडून आणला जात होता, मात्र नेत्यांची संवेदनशीलता निवडणूक संपली तशीच संपली की काय असा सवाल निर्माण झालाय..मेहकर तालुक्यातील आरेगाव येथील जवान नागेश राक्षे २४ एप्रिलला त्रिपुरा येथे शहीद झाले. मतदानाच्या दिवशी २६ एप्रिलला त्यांच्यावर आरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र यावेळी जिल्ह्यातील बऱ्याच नेत्यांनी शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला पाठ फिरवल्याचे दिसले. त्यानंतर देखील राक्षे कुटुंबीयांची विचारपूस करण्यासाठी आरेगाव मध्ये कुणी गेल्याचे दिसले नाही. ॲड. शर्वरी तुपकर आणि संदीप शेळके यांनी मात्र तातडीने आरेगाव गाठले.. ॲड.शर्वरी तुपकर या शहीद जवान नागेश राक्षे यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होत्या तर संदीप शेळके यांनी आरेगाव गाठून राक्षे कुटुंबीयांचे सांत्वन केले.