धनत्रयोदशीला बुलडाण्यात रंगला "बुद्धीचा खेळ'!

गुणवत्तावान खेळाडूंचे "चेकमेट' पाहण्याची मिळाली पर्वणी!! राज्य बुद्धिबळ स्पर्धेने दिवाळीचा आनंद द्विगुणित
 
 
File Photo
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा... अशी दिवाळीची परिपूर्ण व्याख्या एका कवीने केली आहे. मात्र भाग्यवान बुलडाणावासीयांचा दिवाळीचा आनंद बुलडाणा शहरात आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेने आणखीनच द्विगुणित झाल्याचे आज, २ नोव्‍हेंबरला दिसून आले.

chess

धनत्रयोदशीच्या शुभ, पावन मुहूर्तावर जिल्हा क्रीडा संकुलात राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात माईंड चेस अकॅडमी, बुलडाणा तहसील कार्यालय आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा झाली. यासाठी २०० खेळाडूंना निशुल्क प्रवेशासह निमंत्रित करण्यात आले. शून्य ते १५ वर्षे आणि त्यावरील खुला गट अशा दोन गटांत स्पर्धा घेण्यात आल्या. एकूण ४० हजारांची बक्षिसे आणि दोन्ही गटांतील प्रथम विजेत्यास ५ हजारांचे बक्षीस असे पुरस्काराचे स्वरुप होते.

स्पर्धेचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एकाचवेळी १०० बोर्डावर सामने खेळविण्याची कौतुकास्पद कामगिरी आयोजकांनी पार पाडली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा अनुभव असलेल्या खेळाडूंमुळे स्पर्धेची शान वाढली. समारोपात आमदार संजय गायकवाड, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष व बुलडाणा अर्बनचे एमडी डॉ. सुकेश झंवर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.