देऊळगाव राजातील पुरुषाचा कोरोनामुळे मृत्‍यू; आज दोन बाधितांची भर

 
corona
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 30 डिसेंबरला कोरोनाचे नवे 2 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, बुलडाण्याच्या स्त्री रुग्णालयात देऊळगाव राजा येथील 50 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्‍यामुळे बळींचा एकूण आकडा 676 वर गेला आहे.a

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 540 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 538 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 2 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणीमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 217 तर रॅपिड टेस्टमधील 321 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले रुग्ण बुलडाणा शहरातील छत्रपतीनगरातील एक असून, दुसरा मलकापूर शहरातील आहे. आजपर्यंत 746295 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86984 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 410 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87674 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत 14 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.