मेहकरात डेंग्यूचे थैमान! १७ वर्षीय विद्यार्थिनीने जीव गमावला..! चार हॉस्पिटल मध्ये झाला उपचार पण...

 
dengu

मेहकर( लाइव्ह ग्रुप नेटवर्क):  शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे. एका सतरावर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर नगर परिषद प्रशासन मात्र अजूनही झोपेतच आहे.

पूजा विजय जगदाळे (१७) असे डेंग्यूचा बळी ठरलेल्या मुलीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी थंडी, तापेने ती आजारी पडली. तिला शहरातील एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. तेथे चार दिवस उपचारानंतरही प्रकृतीत फरक पडला नाही. त्यामुळे दुसऱ्या खासगी दवाखान्यामध्ये तिच्यावर सात दिवस उपचार करण्यात आले. मात्र काही आराम मिळाला नाही. त्यानंतर तिला शहरातीलच तिसऱ्या खासगी दवाखान्यात नेले  असता डॉक्टरांनी उपचार करून तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथे पाठवले. तेथे काही तपासणी केल्यानंतर तिला डेंग्यू झाल्याचे निदान झाले. मेहकर शहरात तिच्या आजाराबाबत तपासण्या केल्यानंतरसुद्धा डेंग्यूचे निदान झाले नाही. लवकर निदान नझाल्याने तिचा आजार वाढत गेला. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली.

शहरातील बालाजीनगर, शिक्षक कॉलनी, पवनसुतनगर व अन्य वस्ती तयार झालेल्या भागात नाल्या नसल्यामुळे सांडपाण्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने होत नाही. यामुळे या भागात गटारे निर्माण झाली आहेत. मच्छरांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. त्याचबरोबर शौचालयाच्या

सेफ्टीटॅकमध्येसुद्धा मच्छरांच्या अळ्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. याला प्रतिबंध घालण्यासाठी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सेफ्टी टॅकच्या गॅसपाइपवर जाळी बांधण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच या भागात धूर फवारणी व डास नियंत्रण फवारणी करण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.