पराभवाचे उट्टे... मेहकर, लोणार, बुलडाण्यातून बाजोरियांसाठी मतदान नाही?; पिंजरकरांनी घरच्या भेद्यांवर ओढले शरसंधान!; आता ते गद्दार कोण याची चर्चा जिल्ह्यात सुरू

 
शिवसेना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विधान परिषदेच्या अकोला- बुलडाणा- वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव झाला. तिन्ही जिल्ह्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेत्‍यांनी बाजोरियांना किती मदत केली, हे सर्वश्रुत असल्याने निवडणूक निकालाचे कुणाला फारसे आश्चर्य वाटले नाही. मात्र आता या पराभवाचे उट्टे काढले जात असून, यामुळे शिवसेनेतील अंतर्गत धुसफूसही समोर येऊ लागली आहे. बाजोरियांचा पराभव हा "घरातल्याच' (म्‍हणजे पक्षातीलच) लोकांनी केलेल्या गद्दारीमुळे झाला असून, मेहकर, लोणार, बुलडाण्यात  बाजोरियांना मतदान झाल्याचे दिसत नाही, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे पश्चिम विदर्भाचे सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी केला आहे. बाजोरियांनी सुद्धा घरच्यांनी केलेला घात हा व्यथित करणारा असल्याचे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना पिंजरकर व बाजोरियांनी केलेल्या या आरोपांमुळे हे गद्दार कोण, याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

१४ डिसेंबरला विधान परिषद निवडणुकीचा निकाल घोषित झाला होता. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र असतानाही सलग १८ वर्षे आमदार राहिलेल्या बाजोरियांचा भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी पराभव केला. भाजपच्या तुलनेत मतदारांची संख्याही महाविकास आघाडीकडे जास्त होती. तरीही स्वकियांनी केलेल्या घातामुळे बाजोरियांना अपमानजनक पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनी भाजपाला मतदान केल्याचे अनेक जण खासगीत बोलत होते.

मात्र शिवसेनेच्या विभाग सहसंपर्कप्रमुखांनी याबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. "अनेक लोकांना पक्षांमुळे चांगली पदे मिळाली. ते असे वागतील असे वाटले नव्हते. बाजोरिया यांच्याशी पटत नव्हते तरी ते पक्षाचे उमेदवार होते हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे होते. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या घरातून भाजपाच्या उमेदवाराचे पैसे वाटले गेले. मेहकर, लोणार आणि बुलडाण्यात शिवसेना नेत्यांनी बाजोरिया यांचे काम केले नाही,' असा हल्लाबोल श्रीरंग पिंजरकर यांनी केला आहे. या सर्व गोष्टी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्या आहेत. त्यांनी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबईला बोलावले आहे. तेव्हा सर्व पुरावे उद्धव ठाकरे यांच्याकडे देऊ, असेही पिंजरकर म्हणाले.

बाजोरिया म्हणाले, घरच्यांनी केलेला घात व्यथित करणारा...
गोपीकिशन बाजोरिया वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, की घरच्या लोकांनी विश्वासघात केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे घरच्यांनी केलेला घात व्यथित करणारा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तब्येत चांगली झाल्यानंतर त्यांना विश्वासघात करणाऱ्यांची नावे सांगणार आहे. ते त्यांच्यावर कठोर कारवाई नक्कीच करतील, असेही बाजोरिया म्हणाले.

खा. जाधव आणि आ. रायमूलकरांनी मदत केली का?
शिवसेना नेते अरविंद सावंत, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर यांनी मदत केली का, असा प्रश्न  बाजोरिया यांना विचारण्यात आला त्यावेळी अरविंद सावंत यांनी चांगली मदत केली, असे ते म्हणाले. मात्र खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार रायमूलकर यांच्याबद्दल बोलण्यास बाजोरियांनी नकार दिला. त्यामुळे खा. जाधव आणि आ. रायमूलकर यांनी त्‍यांना मदत केली की नाही, हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला.