उत्पादन घटल्याने भाजीपाला महागला !; बुलडाण्यात कोबी, वांगे १०० रुपये किलो!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, अचानक पसरलेली धुक्याची चादर यामुळे भाजीपाला उत्पादनात मोठी घट झाली आहे. कालपासून बुलडाणा व चिखलीच्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर महागले आहेत. बुलडाणा आणि चिखलीच्या बाजारात आज, ३० डिसेंबर रोजी वांगे आणि कोबीला १०० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. मात्र गारपीट आणि धुक्यामुळे शेतकऱ्यांकडे पुरेसा माल नसल्याने भाववाढीचा हवा तेवढा फायदा मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. गारपिटीमुळे व धुक्यामुळे फुलोरा असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आधीच्या थंडीमुळे वांगे, मिरचीची फुलगळ झाली. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. बुलडाण्याच्या बाजारात आठवडाभरापूर्वी सरासरी २० क्विंटल वांग्याची आवक होते, ती आता घटून २ क्विंटलपर्यंत आली आहे. चिखलीच्या बाजाराचाही तीच अवस्था आहे.

असे आहेत भाव (प्रतिकिलो)
वांगे, गोबी : १००
टोमॅटो : ६०
मिरची :  ५०
मेथी :  ८०
पालक : ५०
गाजर :  ५०

शेतकरी म्हणतात
थंडीमुळे व गारपिटीमुळे दोन दिवसांत पिकांच्या काढणीवर परिणाम झाला. फुलगळ झाल्यामुळे फळधारणा होत नाही. थंडीमुळे पिके करपली आहेत. याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याने भाव वाढले आहेत. महिनाभरात भाव आणखी वाढू शकतात.
- राजेंद्र जाधव, भाजीपाला उत्पादक, कव्हळा