बाप्पा बाप्पा! आजारपणाचे कारण दाखवून शिक्षकाने उपभोगल्या ८५ सुट्टया! शाळेची पटसंख्या घसरली ; शिक्षकाची बदली करा मेहकर तालुक्यातील सावत्रा ग्रामस्थांची मागणी..
सावत्रा येथील ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. यामध्ये वर्ग एक ते चार असून यापूर्वी पटसंख्या चांगली होती. परंतु सद्यस्थितीत वर्ग एक मध्ये एकच विद्यार्थी, दुसरीत आठ विद्यार्थी, इयत्ता तिसरी मध्ये अकरा तर चौथीसाठी आठ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. असे एकूण २८ विद्यार्थीच या शाळेमध्ये शिकत असल्याचे समजते. शिक्षक विजय गवई हे पाच वर्षांपासून शाळेमध्ये कर्तव्यावर आहेत. परंतु सतत आजारपणाचे कारण दाखवून त्यांनी ८५ वेळा रजा घेतली असल्याचे ग्रामपंचायतीने निवेदनात म्हटले आहे. गवई यांच्या विषयी 'बीडीओ' , 'बियो' , केंद्रप्रमुख यांना कळविण्यात आले परंतु त्यांनी आजवर कुठलीही कारवाई केलेली नाही. या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती थांबली आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य कसे राहील? असा महत्त्वाचा सवाल उपस्थित होतो. शिक्षक विजय गवई यांच्या प्रति प्रचंड नाराजी असून त्यांची तातडीने बदली करावी अन्यथा पुढील काही दिवसांमध्ये शाळेला कुलूप ठोकू असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे.