शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळणार; पुढील ४ दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामात अतिवृष्टीने खचला. त्यानंतर रब्बी हंगामात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गारपीट आणि धुक्याने शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले. त्यानंतर आता पुन्हा जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्यात ८ ते ११ जानेवारी दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या तर तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळणार असल्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
भारतीय हवामान खात्याने आज, ७ जानेवारीला वर्तविलेल्या अंदाजानुसार पश्चिमी चक्रवातामुळे जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान तयार  होत आहे. त्यामुळे ८ ते ११ जानेवारी दरम्यान अवकाळी पाऊस कोसळू शकतो. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार असल्याने शेतकऱ्यांनी वीज चमकत असताना झाडाखाली न थांबता सुरक्षित ठिकाणी थांबावे. जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच कापणी आणि मळणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.