बुलडाणा शहरात वाढतोय कोरोनाचा धोका!

दाेन दिवसांत सहा रुग्‍ण आढळले!!
 
 
corona
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरात कोरोनाचा धोका वाढल्याचे दिसून येत असून, काल, 17 नोव्‍हेंबरला 4 बाधित आणि आज, 18 नोव्‍हेंबरला 2 रुग्‍ण समोर आले आहेत. दोनच दिवसांत 6 रुग्‍ण आढळल्याने यंत्रणाही चिंतित झाली आहे. काल बुलडाणा शहरातील रामनगरात 1 व इतापे ले आऊटमध्ये 1, डॉ. संचेती हॉस्पिटलजवळ 2 बाधित आढळले होते. आज सुंदरखेडमध्ये 1, आनंदनगरात 1 रुग्‍ण आढळला. याशिवाय आज शेगाव शहरातील व्यंकटेशनगरातही 1 बाधित आढळला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 260 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 257 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 3 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील चाचणीमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 77 तर रॅपिड टेस्टमधील 180 अहवालांचा समावेश आहे. आजपर्यंत 734944 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

त्याचप्रमाणे आजपर्यंत 86945 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 91 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87636 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 17 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 674 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.